सोनवडीत नियमबाह्य पद्धतीने घरकुल यादी | पुढारी

सोनवडीत नियमबाह्य पद्धतीने घरकुल यादी

बारामती : पुढारी वृत्तसेवा; सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे घरकुलांसाठी यादी तयार करताना पात्र लाभार्थ्यांना अपात्र, तर अपात्र ठरणार्‍यांना पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत आजीम सय्यद व अन्य ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल करीत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. शासनाकडून प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी अर्ज मागविले होते. त्यावर 57 ग्रामस्थांकडून अर्ज करण्यात आले. यातील 42 जणांची यादी तयार करीत ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आली. ही यादी पंचायत समितीलाही सादर करण्यात आली.

परंतु, त्यानंतर काही दिवसांनी पंचायत समितीच्या काही अधिकार्‍यांनी गावात येत सर्वेक्षण केले. त्यात नियमानुसार 42 जणांना पात्र ठरविण्यात आले. परंतु, त्यानंतर ग्रामपंचायत व सदरील अधिकार्‍यांनी पात्र व्यक्तींची यादी बदलल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.
गावात ज्यांच्याकडे वाहने, पक्की घरी आहेत, त्यांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत. दुसरीकडे, गावामध्ये ज्यांच्या नावे कोणतेही घर, मिळकत नाही अशा लोकांना यादीतून अपात्र ठरविण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यादी बदलणार्‍यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा

 रिमोट कंट्रोल भाजपकडे तर घेणार महत्त्वाची खाती!

कोडीतला पावसाअभावी भातरोपांची वाढ खुंटली; कृत्रिमरीत्या पाणी देऊन रोपे जगवण्याचा प्रयत्न

गणपतीनिमित्त जादा रेल्वे; उद्यापासून प्रवाशांना आरक्षण मिळणार

 

Back to top button