पिंपरी :  राज्यातील राजकारणाचे स्थानिक पडसाद! | पुढारी

पिंपरी :  राज्यातील राजकारणाचे स्थानिक पडसाद!

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी :  राष्ट्रवादी तसेच काँगे्रसबरोबर सत्तेत न राहण्याचे कारण देत शिवसेनेच्या बंडखोर तसेच काही अपक्ष आमदारांनी भाजपसोबत जाण्याचे ठरविल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे राज्यातील सत्ता समीकरण बदलले आहे. आगामी महापालिकांच्या निवडणुकांत याचा परिणाम निश्चितपणे दिसून येईल. पालिका निवडणुकांना शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँगे्रस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून सामोरे जातील, की स्वबळावर लढतील, याबाबत अजूनतरी कोणतेच चित्र स्पष्ट नाही. मात्र सत्ता नाट्यामुळे भाजपला बळ मिळाले असून, इतर पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शिवसेनेसारख्या कडव्या संघटनेत आजवर अनेकदा बंड झाली; परंतु पिंपरी- चिंचवडमधील शिवसैनिक तसूभरही हलला नाही. तो ठाकरे सेनेसोबतच राहिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हेच चित्र दिसले आहे; मात्र आता शिंदे मुख्यमंत्री झाल्याने काही उलथापालथ होणार का याबाबत उत्सुकता आहे.

घर मालकांकडून घर भाडेकरुवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी काळभोरनगरमध्ये सर्वप्रथम शिवसेनेचे बीज रोवले गेले. शिवसेना फुगेवाडी शाखेचे उद्घाटन तर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते.
पिंपरी- चिंचवड मधील शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला कडवा सैनिक मानला जातो. अनेकदा त्याचे प्रत्यंतर आले. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्या बंडा नंतरही शहरातील सैनिक सोबतच राहिला.

शिवसेनेत गजानन बाबर विरुद्ध बाबासाहेब धुमाळ, बाबर विरुद्ध अगस्ती कानेटकर, सुलभा उबाळे विरुद्ध सीमा सावळे असे अनेक संघर्ष पक्षाने अनुभवले; मात्र बाबर , सावळे, आशा शेंडगे यांचा अपवाद वगळता कोणीही शिवसेनेशी फारकत घेतली नाही. लोकसभेला शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली तेव्हा गजानन बाबर यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला; मात्र नंतर त्यांनीही मला भगव्यातच मरायचं आहे, अशी भावनिक साद घातली.

उद्धव ठाकरे यांनी ही साद ऐकली व त्यांना शिवसेनेत पुन्हा प्रवेश दिला. पिंपरी महापालिका विषय समितीच्या एका निवडणुकीत तत्कालीन नगरसेवक प्रतीक झुंबरे यांचे एक मत फुटल्याचा आरोप झाला. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना केलेली जबर मारहाण आजही शहरवासीयांच्या स्मरणात आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शहरातील शिवसैनिक ठाकरे सेनेसोबतच असल्याचे तूर्त तरी दिसत आहे.

शिंदे यांचा निषेध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसैनिकांनी शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले. या आंदोलनातील तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. सोमवारी शिवसेना संपर्कप्रमुख सचिन आहेर यांनी पक्ष पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीस शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, युवा सेनेचे विश्वजीत बारणे, कामगार नेते इरफान सय्यद आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आपण पक्षासोबतच असल्याचे त्या आधीच सांगितले होते. त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे हे पदाधिकार्‍यांच्या बैठकीला उपस्थित असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले, तर शहर प्रमुख सचिन भोसले हे पालखीला गेल्याचे खुद्द संपर्कप्रमुखांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिंपरी महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे, खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. मात्र तूर्त तरी या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शहरात लावण्यात आलेले फ्लेक्सही शिवसैनिकांनी फाडले व आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले; मात्र राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांना भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदी संधी दिल्याने भविष्यात शिवसेनेतील कोणी नेते अथवा शहरातील शिवसैनिक शिंदे यांच्या समवेत जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

 

Back to top button