ढेकळेही फुटली नाहीत, पेरण्या कधी ? | पुढारी

ढेकळेही फुटली नाहीत, पेरण्या कधी ?

वाफगाव : पुढारी वृत्तसेवा; कोकणासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, परंतु खेड तालुक्यात अद्याप पाऊस सुरू झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेषतः खेडच्या पूर्व भागातील गोसासी परिसरात जुलै महिना सुरू झाला तरी मान्सून न बरसल्याने शेतातील ढेकळेही फुटलेली नाहीत. त्यामुळे शेतीची कामे रखडली असून, मशागती व पेरण्या कधी करायच्या, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. जून महिना संपला व जुलै सुरू झाला तरी पेरण्यायोग्य पाऊस होत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

कनेरसर, पूर, वाकळवाडी, गोसासी परिसरात पावसाचे ढग दाटून येतात, परंतु पाऊस पडत नाही. काही गावांत अत्यल्प पाऊस झाला, शेतात काही प्रमाणात ओल झाल्याने काही शेतकर्‍यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. दरम्यान, पूर्व भागातील अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील ढेकळे फुटली नाहीत. शेतीची कामे सुरू होण्यासाठी संततधार पावसाची गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मारुती गोरडे यांनी सांगितले.

अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. मागील वर्षी या परिसरात पुरेसा पाऊस पडला नाही. त्याचा परिणाम शेतीतील उत्पन्नावर झाला. आतादेखील पाऊस लांबल्याने खरीप हंगाम पुढे गेला आहे, त्यामुळे यंदादेखील शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. शेती ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुरळीत ठेवते, परंतु पाऊस पडत नसल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील इतर उद्योग धंद्यावर झाला आहे.

Back to top button