ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ; पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 7 पर्यंत अवधी | पुढारी

ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ; पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 7 पर्यंत अवधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम अर्थात पॉलिटेक्निक प्रवेशासाठी 2 जूनपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी आता 7 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहे. प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे.

विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करावी. दि. 7 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्चिती करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिल 2022 या वर्षात इयत्ता दहावीची परीक्षा दिली आहे, त्यांनी शैक्षणिक पात्रता तपशीलामध्ये स्वत:चा आसन क्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करावेत, असेही सूचित करण्यात आले आहे.

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात : 2 जून
अर्ज नोंदणी करण्याची मुदत : 7 जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार : 9 जुलै
यादीवरील आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत : 9 ते 11 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 12 जुलै

Back to top button