…आज पाचर्णे आमदार पाहिजे होते! | पुढारी

...आज पाचर्णे आमदार पाहिजे होते!

निमोणे : पुढारी वृत्तसेवा: भाजप समर्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार राज्यात आले असताना शिरूर-हवेलीमध्ये मात्र आज जर बाबूराव पाचर्णे आमदार असते, तर पाचर्णे यांची मंत्रिपदावर नक्की वर्णी लागली असती, अशी चर्चा होत आहे. 1995 पासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर दोन हात करून बाबूराव पाचर्णे यांनी तालुक्याच्या राजकारणात प्रस्थापितांविरोधात स्वतःचे नेतृत्व सिध्द केले. भाजपचे चिन्ह घेऊन त्यांनी दोनवेळा विधानसभेत धडक मारली. मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला अन् त्यानंतर पाचर्णे वैयक्तिक अडचणींमुळे दोन वर्षांपासून जवळजवळ अज्ञातवासातच आहेत. आज सत्तांतर घडत असताना शिरूर-हवेलीच्या राजकीय पटावर पाचर्णे यांची तीव्रतेने उणीव भासत आहे.

दक्षिण पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वांत जास्त संघर्ष करणारा प्रस्थापितांविरोधात तब्बल तीस वर्षांपासून झुंज देणारा नेता म्हणून पाचर्णे यांच्या नावाचा भाजपला नक्की विचार करावा लागला असता. भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यापेक्षा पाचर्णे हे राजकारणात वरिष्ठ आहेत. मात्र, आज ते आमदार नाहीत आणि राजकारणात जर-तरला काहीच किंमत नसते. याची जाणीव ठेवून शिरूर-हवेलीतील पाचर्णेसमर्थक म्हणा किंवा भाजपसमर्थक म्हणा, आगामी फडणवीस मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातून नक्की कोणाची वर्णी लागते, याचेच आडाखे बांधत आहेत.

Back to top button