पिंपरी : रुग्णसेवेचा मोठा ताण खेड, मंचर, मुळशीतूनही येतात रुग्ण | पुढारी

पिंपरी : रुग्णसेवेचा मोठा ताण खेड, मंचर, मुळशीतूनही येतात रुग्ण

दीपेश सुराणा :  पिंपरी : गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी हक्काचे रुग्णालय म्हणून आजही वायसीएम रुग्णालयाकडे पाहिले जाते. त्यामुळे या रुग्णालयात शहराबाहेरुन देखील रुग्ण उपचारासाठी येतात. खेड, मंचर, मावळ, मुळशी येथून येणार्‍या रुग्णांवर देखील या रुग्णालयात उपचार केले जातात.

रुग्णालयात दररोज दीड ते दोन हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते. त्यामुळे रुग्णसेवेवर पडणारा ताण मोठा आहे. हा ताण कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे. कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त ताण हा नेहमीच घातक असतो. त्यामुळे त्याचा नेहमीच्या कामावर परिणाम होतो. अशीच काहीशी परिस्थिती वायसीएम रुग्णालयाबाबत झाली आहे.

रुग्णालयावर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी महापालिकेने नव्याने 4 रुग्णालये सुरु केली. नवीन भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय (पिंपरी), आकुर्डी रुग्णालय, थेरगाव रुग्णालयाचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे काही प्रमाणात हा ताण हलका झाला. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविणे शक्य होत नसल्याची सध्याची वस्तुस्थिती आहे. वायसीएम रुग्णालयात उपचार घेणारे जवळपास 30 ते 40 टक्के रुग्ण महापालिका हद्दीबाहेरील आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर पडणारा हा ताण हलका कसा करता येईल, या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रुग्णालयात काय हवे?

युरोसर्जन व्हस्क्युलर (रक्तवाहिन्यासंबंधी) शल्यविशारद; कर्करोग शल्यविशारद; जळीत रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड
नातेवाईकांना बसण्यासाठी व विश्रांतीसाठी जागा; परिचारिका, तंत्रज्ञ, लेखनिक असे विविध प्रकारचे मनुष्यबळ.

उपाययोजना काय?
रुग्णालयात सध्या प्रामुख्याने जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी वर्ग-3 आणि वर्ग-4 चे एकूण 206 कर्मचारी महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. 1 जुलैपासून हे कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयात जाणवणारी डॉक्टरांची उणीव येथील पदव्युत्तर संस्थेत प्रशिक्षण घेणार्‍या डॉक्टरांमुळे भरुन निघत आहे. सध्या येथे 76 प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपलब्ध आहेत. तर, 36 प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रस्तावित आहेत. रुग्णालयात कायमस्वरुपी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी नियोजन करण्यात यायला हवे.

रुग्णालयात रुग्णांवर हळूहळू उपचार केले जातात. ही सर्वात मोठी समस्या आहे. रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करणे गरजेचे आहे. उपचारातील विलंबामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
– कुंडलिक वानखेडे, रुग्णाचे नातेवाईक.

Back to top button