ताथवडेत शाळा सुटण्याच्यावेळी वाहतूक कोंडी | पुढारी

ताथवडेत शाळा सुटण्याच्यावेळी वाहतूक कोंडी

ताथवडे : पुनावळे व ताथवडे परिसरातील शाळा भरण्याच्या, सुटण्याच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. ताथवडे व पुनावळे गावाचा विकास झपाट्याने होत आहे. अनेक नामांकित शाळा व महाविद्यालये या ठिकाणी असल्याने हा परिसर नवीन शैक्षणिक हब म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे.

तब्बल दोन वर्षांनंतर सर्व शाळा, महाविद्यालये जोमाने सुरू झाली आहेत. नामांकित शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढलेली आहे. परंतु, शाळा सुटताना किंवा भरताना शाळेभोवती होणारी वाहतूककोंडी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
शाळांबाहेर मुलांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांच्या खासगी गाड्या, शालेय मुलांना ने आण करणार्‍या बसेसची वाढती संख्या, खासगी वाहनांची गर्दी यामुळे शाळेच्या आवाराभोवती मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे.

नशिबालाच कर्तृत्व समजले की र्‍हासाची सुरुवात ; राज ठाकरे

किमान तासभर या वाहतूककोंडीत पालकवर्ग अडकून जात आहे. सध्या सर्व ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे अगोदरच शाळेच्या परिसरातून वाट काढताना दमछाक झालेली असताना येथील रस्त्यावरील वाहतूककोंडीचाही सामना करावा लागत असल्याने पालकवर्गात नाराजीचा सूर आहे.

खासगी वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून केली जाणारी वाहतूक, दुचाकी अथवा चारचाकी वाहनांतून मुलांना सोडण्यासाठी आलेले पालक, कर्कश ह़ॉर्न वाजवूनकोंडी करणार्‍या शाळांच्या बस यामुळे शाळांबाहेर होणारी वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. गरज नसतानाही काही धनाढ्य पालक आपल्या पाल्याला ने-आ करण्यासाठी मोठी गाडी आणतात. त्यामुळे गर्दीत आणखीनच भर पडत आहे. शाळेच्या आवारात रिक्षा, बसेस, दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहने कसेही लावली जातात.

एखाद्या प्रतिष्ठित पालकाचे वाहन असल्यास तर सुरक्षारक्षकांना त्यांची वाहने काढताना मोठी कसरत करावी लागते. आहे. महिलावर्ग आपल्या पाल्याला ने-आ करताना मोठ्या समस्याचा सामना करावा लागत आहे. काही वेळा दुचाकीवरून तोल जाऊन पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शालेय प्रशासनाने तसेच वाहतूक विभागाने यावर योग्य आणि ठोस उपाययोजना करावी, शाळेबाहेरील वाढती गर्दी आणि परिणामी विद्यार्थ्यांची धोक्यात आलेली सुरक्षा यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

आम्ही सर्व शाळांना वाहतूककोंडी विषयक नोटिसा देत आहोत. शालेय प्रशासनाला आम्ही पार्किंगविषयी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. जर काही वाहने नो पार्किंग झोनमध्ये आढळली तर त्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
– सुनील पिंजन,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
वाहतूक विभाग वाकड

Back to top button