पुणे : ‘लिव्ह इन’च्या वादातून मारहाण | पुढारी

पुणे : ‘लिव्ह इन’च्या वादातून मारहाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकत्र राहत असताना मुलाबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणीने व तिच्या नातेवाइकांनी मुलाच्या वडिलांसह घरच्या लोकांना बेदम मारहाण केली. ही घटना मांजरी येथील महादेवनगर परिसरात
घडली आहे. याप्रकरणी मांजरीतील महादेवनगर येथे राहणार्‍या 52 वर्षांच्या नागरिकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी एक तरुणी व तिची आई, वडील यासह मनोज पाटील, आकाश राऊत, रामदास लोहकरे (सर्व रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पत्नी, दोन मुली व मुलासह मांजरीत गेल्या तीन वर्षांपासून राहतात. त्यांचा 23 वर्षांचा मुलगा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत आहे.

पुणे : शिंदवणे घाटात क्रेन दरीत कोसळली

तो गेल्या दीड वर्षापासून एका तरुणीबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये राहतो. 23 जून रोजी त्या दोघांमध्ये भांडणे झाल्याने तरुणी तिच्या घरी निघून गेली. त्यांचा मुलगा कामाला गेला असताना शनिवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता तरुणी, तिचे आई-वडील व इतर नातेवाइकांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी आली.

बोलायचे असल्याचे सांगून घरात शिरले. त्यांनी घरातील सर्वांना मारहाण केली. त्यांच्या पत्नीच्या पोटात एकाने लाथ मारली. त्यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या मुलीने भावाला बोलावून घेतले. पोलिसांना कळविले. तिचा भाऊ आला असताना त्यालाही त्यांनी मारहाण करून ते कारमधून पळून गेले. पोलिस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

Back to top button