कोंढवा रस्त्याला ओढ्याचे रूप; पथ विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

कोंढवा रस्त्याला ओढ्याचे रूप; पथ विभागाचे दुर्लक्ष

कात्रज : पुढारी वृत्तसेवा: पुणे शहरासह कात्रज उपनगरात गेले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. अतिक्रमणांमुळे नामशेष झालेले ओढे आणि पावसाळीपूर्व कामांच्या भोंगळ कारभारामुळे पावसाचे पाणी थेट कात्रज-कोंढवा रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्याला ओढ्याचे रूप आले. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे वाहनचालकासह नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अतिक्रमणामुळे महादेवनगर टेकडी, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर, गोकुळनगर भागात नैसर्गिक प्रवाह नामशेष झाले आहेत.

तसेच बहुतांश भागात पावसाळीपूर्व कामांतर्गत पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी थेट कात्रज-कोंढवा रस्त्यावर येताना दिसत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आवश्यक उतार न दिल्याने पाणी साचत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पथ विभागाने कात्रज-कोंढवा रस्त्याचे एका बाजूने डांबरीकरण केले. मात्र, दुसरी बाजू तशीच सोडून आहे.

कात्रज-कोंढवा अरुंद रस्ता
दुर्लक्षित पावसाळीपूर्व कामे, अर्धवट डांबरीकरण, पावसाळी लाईन, साईड पट्ट्या अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात रस्ता अडकला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचे घोंगडे मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे भिजत पडले आहे. मात्र, वापरातील रस्ता तरी सुस्थितीत करावा, अशी माफक अपेक्षा कात्रज-कोंढवा रोड परिसरातील नागरिकांत व्यक्त होत आहे.

Back to top button