पिंपरी :आयटीआयमध्ये उत्पादनाभिमुख प्रशिक्षण, महापालिकेचा निर्णय | पुढारी

पिंपरी :आयटीआयमध्ये उत्पादनाभिमुख प्रशिक्षण, महापालिकेचा निर्णय

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आता उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. तसेच बदलत्या काळानुसार ड्रोन टेक्नोलॉजी, स्मार्ट सिटी टेक्नोलॉजी, मॅकेट्रोनिक्स, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नोलॉजी, असे साधारणपणे 30 नावीन्यपूर्ण ट्रेड्स सुरू करण्याच्या दृष्टीने धोरण तयार करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सुधारित शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्या आयटीआयमध्ये या योजना राबविण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले असून या धोरणास महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रशासक राजेश पाटील यांनी या धोरणास मान्यता दिली.

महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यान्वित आहे, तर कासारवाडी येथे मुलींसाठी स्वतंत्रपणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध ट्रेड्स शिकवले जातात. यामध्ये कालानुरूप बदल करून ज्या कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख ट्रेड्सची गरज आणि मागणी आहे, असे ट्रेड्स नव्याने सुरु करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते.

या औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. असे मनुष्यबळ सहज उपलब्ध व्हावे तसेच युवकांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे ट्रेड्स सुरु करण्याची आवश्यकता विचारात घेऊन धोरण तयार करण्यात आले आहे. उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना परिणामकारकरित्या राबवून संस्थांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे, प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणासाठी लागणार्‍या कच्च्या मालावर होणार्‍या खर्चामध्ये बचत करणे.

प्रशिक्षणार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रात्यक्षिक कौशल्यात व सरावात वाढ करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगार करण्यासाठी सक्षम बनवणे, प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांना औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष उत्पादन कामाचा अनुभव देऊन कामाबद्दल आत्मविश्वास व आवड निर्माण करणे. या योजनेद्वारे या योजनेंतर्गत विविध ट्रेड्स सुरू करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. यामध्ये ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, शिवणक्लास, सर्फेस ओर्नामेंटेशन टेक्निक्ससारख्या ट्रेड्सचा समावेश आहे.

मेकॅनिक अ‍ॅग्रीकल्चरल मशिनरी, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ट्रॅक़्टर, मेकॅनिक टू अँड थ्री व्हीलर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, बेसिक कॉसमेटोलॉजी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर टेक्निशियन, फाउन्ड्रीमॅन, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मरीन फिटर , मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स, ऑपरेटर अ‍ॅडवान्स मशीन टूल्स, टूल्स अँड डाय मेकर, टर्नर, अ‍ॅरोनॉटीकल स्ट्रक्चर इक्विपमेंट फिटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर, इलेक्ट्रोप्लेटर, लॅब्रोटरी असिस्टंट, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, कारपेंटर, इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन, सर्वेअर, पेंटर, इलेक्टॉनिक्स मेकॅनिक, बेकर, फूड प्रोडक्शन, फ्रुट अँड व्हेजिटेबल्स प्रोसेसिंग, फिजिओथेरपी टेक्निशियन, कंप्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, कंप्युटर ऑपरेटर अँड प्रोगामिंग असिस्टंट, इन्फोर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मॅनेजमेंट, मल्टीमिडीया, अ‍ॅनिमेशन अँड स्पेशल इफेक्ट्स, डिजिटल फोटोग्राफर, आदी अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.

परिगणना करण्याची पद्धती निश्चित
या उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना राबविण्याकरीता धोरण निश्चित करताना मार्गदर्शक सूचना, उत्पादन प्रक्रियेत भाग घेणार्‍या कर्मचारी आणि प्रशिक्षाणार्थ्यांच्या मानधनाची रचना तसेच वस्तूची किंमत, मशिनचा प्रतितास खर्च, मजूरीचा प्रतितास दर आदींची परिगणना करण्याची पद्धती निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.

Back to top button