जेजुरीत रोहित्र फोडून तारा चोरणारी टोळी जेरबंद | पुढारी

जेजुरीत रोहित्र फोडून तारा चोरणारी टोळी जेरबंद

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : शिवरी (ता. पुरंदर) परिसरातील न्यू पुरंदर प्रॉपर्टीज कंपनीचे रोहित्र फोडून त्यातील तारा चोरणारांना जेजुरी पोलिसांनी अटक केली. रोहित्र फोडण्याची घटना दि. 7 जून रोजी घडली होती.

प्रमोद साहेबराव मिसाळ (रा. अंदोरी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), ऋषिकेश पांडुरंग पाटोळे (रा. हडपसर गाडीतळ वेताळबाबा वसाहत, पुणे), आनंद अशोक शहा (रा. दवणे मळा, जेजुरी, ता. पुरंदर), प्रथमेश बाळासो खोमणे (रा. जेजुरी) तसेच तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी दि. 20 जून रोजी अटक केली.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू पुरंदर प्रॉपर्टीजचे रोहित्र फोडून चोरट्यांनी तांबे व अ‍ॅल्युमिनीअमच्या तारा चोरून नेल्या. याबाबत जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जेजुरी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रीकरण व गुप्त बतमीदारांकडून माहिती घेऊन आरोपींना जेरबंद केले.

आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असून दि. 22 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. चोरलेली तार पोलिसांनी जप्त केली आहे.

सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, हवालदार दशरथ बनसोडे, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, तात्यासाहेब खाडे, केतन खांडे आदींच्या पथकाने केली.

Back to top button