आकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्यानिमित्त कंट्रोल रूम | पुढारी

आकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्यानिमित्त कंट्रोल रूम

पिंपरी : आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात वारकर्‍यांच्या स्वागताची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेच्या वतीने वारकर्‍यांच्या सेवेसाठी आणि आपत्कालीन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुख्य कंट्रोल रूम उभारण्यात आले आहे.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी सोहळा ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे, त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन, विद्युत, पाणीपुरवठा, स्थापत्य तसेच आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी ग्रुप कमांडर टीमसोबत समन्वय राखून आपत्कालीन नियंत्रण कक्षासाठी आवश्यकता असल्यास मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत; तसेच पालखी सोहळ्यात संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील धडक कारवाई पथकातील अधिकारी, कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवानांचा या कामात आवश्यकतेनुसार समावेश करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे.

यंदाची वारी निर्मलवारी आणि प्लास्टिकमुक्त वारी व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button