पतसंस्थांच्या ठेवी, कर्जावरील व्याज दरात एक टक्क्यांनी कपात | पुढारी

पतसंस्थांच्या ठेवी, कर्जावरील व्याज दरात एक टक्क्यांनी कपात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नागरी, ग्रामीण, कर्मचारी बिगर कृषी पतसंस्थांच्या ठेवी वर दयावयाचा कमाल व्याजदर १०.५० टक्क्यांवरुन कमी करुन ९.५० टक्के करण्यात आला आहे. तर नागरी, ग्रामीण बिगर कृषी पतसंस्थांमधील तारणी कर्जावरील कमाल व्याजदर १४ वरुन १३ टक्के आणि विनातारणी कर्जावरील व्याजदर १६ वरुन १५ टक्के ठेवण्याचा निर्णय पतसंस्था नियामक मंडळाने घेतला आहे.

त्यामुळे ठेवींवरील व्याजदरात एक टक्क्यांनी तर कर्जावरील व्याजदरातही सुमारे एक टक्क्यांनी कपात करण्यात आल्याने कर्ज घेणार्‍यांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पतसंस्था नियामक मंडळाच्या २५ मे २०२१ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व बिगर कृषी पतसंस्थांनी त्याची अंमलबजावणी करावी, अशा सुचना पतसंस्था नियामक मंडळाचे सचिव आणि सहकार आयुक्तालयातील उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी जारी केले आहेत.

कर्मचारी बिगर कृषी पतसंस्थेचा कर्जावरील कमाल व्याजदर पुढीलप्रमाणे ठेवण्यात आला आहे. संस्था स्वनिधीमधून कर्ज वाटप करीत असल्यास कमाल कर्ज व्याजदर १२ टक्के राहील. संस्था इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेत असल्यास अशा वित्तीय संस्थेने ज्या दराने संस्थेस कर्ज दिले आहे, त्या व्याजदराच्या २ टक्क्यांपेक्षा अधिक कर्जाचा कमाल व्याजदर असणार नाही असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या सर्व नमूद बाबींनुसार, कमाल मर्यादेच्या अधिन राहून बिगर कृषी पतसंस्थांनी त्यांचे ठेवींवरील सरासरी व्याजदर आणि कर्जावरील सरासरी व्याजदर ठरवावेत. तसेच हे व्याजदर दिनांक १ ऑगस्ट २०२१ पासून लागू होतील.

तसेच याच तारखेपासून स्वीकारलेल्या ठेवींना व दिलेल्या कर्जास हे व्याजदर लागू राहतील. संस्थेच्या उपविधीमध्ये काहीही नमूद असले तरी नियामक मंडळ वेळोवेळी जाहीर करेल, त्याप्रमाणे ठेवी व कर्जावरील कमाल व्याजदर सर्व बिगर कृषी पतसंस्थांना बंधनकारक राहतील, अशाही सुचना त्यांनी दिलेल्या आहेत.

राज्यातील ग्रामीण-नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थांचा लेखाजोखा

एकूण सहकारी पतसंस्था – १३ हजार ५६८
एकूण ठेवींची रक्कम- ६५ हजार ७७८ कोटी
एकूण कर्जाची रक्कम- ५५ हजार २६६ कोटी
एकूण थकबाकीची रक्कम- ५ हजार ४३३ कोटी ( ९.८३ टक्के)

हेही वाचलंत का? 

‘रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट दर कमी केल्यामुळे राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकांकडील ठेवी आणि कर्जावरील व्याजदर खाली आले आहेत. त्यानुसार पतसंस्था फेडरेशनकडून व्याजदर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ठेवी आणि कर्जावरील व्याज दरात पुर्वीच्या तुलनेत सुमारे एक टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेत पतसंस्था टिकाव्यात आणि कर्ज घेण्यासाठी मागणी वाढण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता.’
– राम कुलकर्णी (उपनिबंधक, पतसंस्था विभाग, सहकार आयुक्तालय)

‘बँकांकडील ठेवींचे व्याजदर साडेपाच ते साडेसहा टक्क्यांच्या आसपास आहेत. कमी व्याजाने ठेवी घेऊन जास्तीत- जास्त कर्जही वाजवी दराने देण्यासाठी व्याजदर कमी करण्याची मागणी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केली होती. याबाबत राज्यातील पतसंस्थांची वेबिनारवर बैठक घेऊन मते अजमावली असता ठेवींवरील व्याजदर ८ टक्के ठेवण्याची मागणी आली. ती सहकार आयुक्तालयास कळविली होती. तरीसुध्दा दर अपेक्षेइतके कमी झालेले नाहीत.’
– काका कोयटे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन)

Back to top button