मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. त्यामुळे हा ट्रक पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कसारा घाटाच्या 100 फूट खोल दरीत कोसळला.
या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने भरपावसात घटनास्थळी धाव घेतली.
अथक प्रयत्नाने गंभीर जखमी असलेल्या 3 जणांना सुखरूप बाहेर काढले. तर एकाचा जागीच मृत्यू झाल्याने सदर मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, लक्ष्मण वाघ, देवा वाघ, जस्सी, बाळू मांगे यांनी 3 तास अथक प्रयत्न करून 3 गंभीर जखमींना वाचविले.
त्यांच्या मदतीला कसारा पोलीस, महामार्ग पोलीस तसेच नागरिक होते.