नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : रिलायन्स-फ्यूचर समूह यांच्यादरम्यानच्या बहुचर्चित सौद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. हा निकाल अमेझॉनच्या बाजूने आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे रिलायन्स-फ्यूचर यांच्यातील सुमारे 24 हजार कोटी रुपयांच्या 'डील'वर स्थगिती आली आहे.
अमेझॉनने दाखल केलेल्या खटल्याच्या अनुषंगाने सिंगापूरच्या आपत्कालीन लवादाने जो निकाल दिला होता, तो भारतातही लागू होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालात म्हटले आहे.
सिंगापूरपाठोपाठ भारतात अमेझॉनने रिलायन्स-फ्यूचर डीलविरोधात याचिका दाखल केली होती. सदर सौद्याविरोधात अमेझॉनने सर्वप्रथम दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सौद्याला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
देशाच्या विविध भागात कार्यरत असलेल्या बिग बझारची मालकी फ्यूचर ग्रुपकडे आहे. 24 हजार 713 कोटी रुपयांमध्ये रिलायन्सने फ्यूचर समूह खरेदी केला होता. फ्यूचर ग्रुपमधील एका कंपनीत अमेझॉनची 49 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.
या पार्श्वभूमीवर अमेझॉनने डीलला विरोध केला होता. कंपनी विकली गेली तर खरेदीचा पहिला अधिकार अमेझॉनचा असेल, अशी अट होती, पण ही अट पाळली गेली नसल्याचा अमेझॉनचा आक्षेप आहे.
दरम्यान, या निकालाने अमेझॉनने दिलासा मिळाला आहे. तर रिलायन्स समूह आणि फ्यूचर समुहाला मोठा झटका बसला आहे.
हे ही वाचा :