

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर शिरडशहापूर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळविले. एटीएम पळवण्याची ही घटना आज (शुक्रवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
घटनास्थळापासून पाच किलोमीटर अंतरावर फोडलेले एटीएम पोलिसांना सापडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरडशहापूर येथे बसस्थानकाजवळ भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे.
शिरडशहापूर येथे परिसरातील सुमारे ३० ते ४० गावांचा संपर्क येतो. याशिवाय औरंगाबादकडून आंध्र प्रदेशात जाणारी वाहने देखील याच मार्गाने धावतात. त्यामुळे या एटीएमचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी मशीन उभारण्यात आले आहे.
दरम्यान, आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे मशीनच उचलून नेले. यावेळी चोरट्यांनी दोरी व इतर साहित्याचा वापर केला.
विशेष म्हणजे एटीएम नेताना काही व्यक्तींना पाहिल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी नाकाबंदीचे आदेश दिले. तसेच परिसरात तपासणी सुरु करण्यात आली.
यामध्ये घटनास्थळापासून पाच किलोमीटर अंतरावर कुरुंदा ते गिरगाव मार्गावर फोडून फेकून दिलेले एटीएम आढळून आले. मात्र त्यातील रक्कम गायब झाली आहे.
या मशीनमध्ये नेमकी किती रक्कम होती याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांची माहिती घेण्याचे प्रयत्न…
या एटीएम मशीनच्या काचा फोडून चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले. त्यामुळे आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.