rain : आता आठ दिवस पावसाची विश्रांती | पुढारी

rain : आता आठ दिवस पावसाची विश्रांती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (rain) दडी मारली आहे. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यापैकी कोल्हापूरसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस (rain) होत आहे. पण शुक्रवारपासून पुढील किमान आठवडाभर पाऊस थांबणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस थांबला आहे. तो सक्रिय होण्यासाठी अनुकूल हवामान नसल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. बहुतांशी भागात आणखी आठवडाभर पावसाची (rain) उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सुरू असलेला पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये 7 ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे.तर ओडिशा वगळता मध्य भारत, महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील आठवडाभर पावसाची दडी कायम राहणार आहे.

पावसाची उघडीप असल्याने राज्याच्या अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्यालगत जोरदार वारे वाहणार आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरीत राज्यात हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात 24 तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

कोकण : पालघर : वसई 31, रायगड : कर्जत
37, माथेरान 52, रोहा 36, रत्नागिरी : चिपळूण
38, गुहागर 47, लांजा 42, मंडणगड 42, राजापूर
38, रत्नागिरी 47, संगमेश्वर 61, सिंधुदुर्ग : दोडामार्ग
51, कणकवली 50, कुडाळ 34, मुलदे 40, रामेश्वर
35, वैभववाडी 40. ठाणे : 41, भिवंडी 31,
उल्हासनगर 50.

मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर : गगनबावडा 101, पन्हाळा 30, राधानगरी 40, शाहूवाडी 30. नाशिक : इगतपुरी 67.
सातारा : महाबळेश्वर 95, पाटण 35.

Back to top button