शिये, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील बुधले मंगल कार्यालयाजवळ महामार्गावर महापूराचे पाणी ओसरल्याने ३ दिवसांनंतर वाहतूक सुरू झाली आहे.
आज (सोमवारी) सकाळी १० वाजता प्रथम अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच अत्यावश्यक वाहने कोल्हापूरच्या दिशेने सोडण्यात आली. सकाळी ७ वाजता रस्तावर प्रात्यक्षिक घेण्यात आली.
पोकलँंड आणि जेसीबीसारख्या अवजड वाहने प्रथमतः प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री केल्यानंतर वाहतुकींसाठी महामार्ग सुरू करण्यात आला.
कोल्हापूर शहराला पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्यामुळे पाण्याचे टँंकर प्रथम पाठविण्यात आले. यानंतर पेट्रोल-डिझेलचे टँंकर, गॅस सिलेंडरचे ट्रक, तर गोकुळचे टँंकरही पाठविले. इतर माल वाहतुकीची वाहने क्रमाक्रमाने सोडणे सुरू होते. यातून प्रथम आमदार विनय कोरे यांना कोल्हापुरकडे जाण्याची संधी मिळाली.
शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे पाणी आलेने प्रथमतः पुण्याकडे जाणारा रस्ता बंद करून एकाच रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. तर, काही कालावधीतच पाण्याची पातळी वाढून ही सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.
रविवारी पावसाने उसंत दिल्याने पाणी पातळी हळुहळु कमी होत सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ४ फुटाने पाणी कमी झाले होते. मात्र, पाणी पातळी वाहतूक सुरू करण्यायोग्य नसल्याने महामार्ग बंदच ठेवण्यात आला होता.
दरम्यान, मागील तीन दिवस महामार्ग बंद असल्याने शेकडो वहाने रस्तावर अडकवून पडली होती. रस्तावर थांबून राहिलेल्या वाहनधारकांना जेवण-पाण्याची व्यवस्था सामाजिक संस्थाकडून सुरू होता.
पुलाची शिरोली आणि हालोंडी या हातकणंगले तालुक्यातील, तर शिये या करवीर तालुक्यातील रहिवासी वस्तीतील पाणी ओसरल्याने घरातील साफसफाई करण्यात नागरीकांनी सुरुवात केली आहे.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून याची धास्ती लागून राहिली पण, सोमवारी पाण्याची पातळी वाढली नसल्याने धोका टळला आहे. पुणे-बंगळूरू महामार्गावरील वाहतूक सुरू झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पहा व्हिडीओ : पाणी ओसरतंय कोल्हापुरकर… तरीही काळजी घ्या
हे वाचलंत का?