सांगली, पुढारी वृत्तसेवा : सांगली महापूर याबद्दल महत्वाची बातमी समोर येत आहे. कराडला 24 फूट, बहेमध्ये 16 तर ताकारीत 10 फूट पाणी उतरले आहे. भिलवडी, सांगली, अंकली आणि म्हैसाळ हा भाग जवळपास समान पातळीवरचा आणि कमी उतराचा असल्याने पाणी उतारास विलंब लागत आहे.
सांगलीत सोमवार (दि. 26) सकाळी पाणी पातळी दोन फुटाने कमी होऊन 52 वर, तर सायंकाळपर्यंत 47 फुटांवर पोहोचेल अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता लालासाहेब मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले, "समाज माध्यमावर पसरणार्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कराडला 24 फूट पाणी उतरले आहे. सांगली जिल्ह्यातील बहे 16 आणि ताकारी 10 फूट उतरले आहे. भिलवडीमध्ये 12 तासात दोन फुटांनी पाणी कमी झाले आहे.
तसेच सांगलीत सात तासानंतर 1 इंच पाणी उतरले. कोयना धरण परिसरात आणि वारणा, पंचगंगेच्या परिसरातील पर्जन्यवृष्टीचा विसर्ग एकाच वेळी कृष्णा नदीला मिळतो.
त्यामुळे पाणी पुढे जाण्यास विलंब होतो. तसेच भिलवडी, सांगली, अंकली आणि म्हैसाळ या भागात फारसा उतार नाही. एकाच पातळीवर नदी धावते.
त्यात हरिपूर येथे वारणेच्या पाण्यामुळे आणि नृसिंहवाडी येथे पंचगंगेच्या पाण्यामुळे कृष्णेचे पाणी पुढे सरकत नाही. परिणामी सांगलीत फुग निर्माण होते.
पण सोमवारी सायंकाळपर्यंत 6 ते 7 फूट पाणी निश्चितच कमी होऊन 47 फुटावर सांगलीची पाणी पातळी पोहोचेल. राधानगरी धरणाचे पाणी पुन्हा सोडले असलेतरीही ते पोहोचायला उद्याचा दिवस लागेल. तोपर्यंत सांगली महापूर पाणी उतरलेले असेल.
पहा व्हिडीओ : पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा