पुणे जिल्हा परिषद कामांच्या देयकांसाठी प्रथम येणार्‍यास प्राधान्य | पुढारी

पुणे जिल्हा परिषद कामांच्या देयकांसाठी प्रथम येणार्‍यास प्राधान्य

पुणे ः पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा परिषद यांचेकडूृन विकास कामांची पूर्तता करण्यासाठी राबविलेल्या शंभर दिवस मोहिमेतील साडेचार हजार कामांची देयके अदा केली जाणार आहेत. उपलब्ध निधी लक्षात घेता जिल्हा परिषदेने प्रथम येणार्‍यास प्राधान्य या सूत्राप्रमाणे सर्व प्रकारच्या कामांची देयक दिली जाणार आहेत.

विकास कामांसाठी जिल्हा परिषदेने शंभर टक्के निधी उपलब्धतेच्या तुलनेत दीडपट नियोजन करून कामे मंजूर केली आहेत. शंभर दिवस मोहिमेमध्ये बहुतांश कामे पूर्ण झाली असून, आता बिले सादर केली जात आहेत. बिले देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे आता शंभर टक्के रक्कम उपलब्ध आहे.

परंतु जास्तीच्या पन्नास टक्के निधी नाही. जिल्ह्यात चार हजार पाचशे कामे पूर्ण झाल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे. त्यामुळे ही सर्व देयके सादर केली जातील. कामांची बिले सादर करताना पुढे-मागे होऊ नये, तसेच विशिष्ट ठेकेदार आणि विशिष्ट प्रकारची शिफारस असणार्‍या लोकांना प्राधान्य दिले जाऊ शकते ही बाब लक्षात घेता प्रथम येणार्‍यास प्राधान्य यानुसार देयके अदा केली जाणार आहेत.

कामांच्या बिलाचे फाईल सादर केल्यापासून त्याची आवक नोंद झाल्यानंतर बिल देईपर्यंतच सर्व प्रवास त्या फाईलवर नमूद असेल. तसेच फाईलच्या हालचाल रजिस्टरची नोंद देखील ठेवली जाणार आहे.

याबद्दलची नियमावली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी तयार केली आहे. त्यामुळे घुसखोरी करून किंवा वशिलेबाजी वर बिले काढण्याच्या कार्यपद्धतीला लगाम बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेमध्ये ठेकेदार आणि विभागाकडून सादर केलेली देयकेच्या क्रमांकाने सादर होतील, त्यात क्रमांकाने त्यांची बिले अदा केली जातील.
– आयुष प्रसाद, सीईओ, झेडपी,पुणे.

पुणे जिल्हा परिषद कामे होणार रद्द

जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या कोणत्याही कामामध्ये आता बदल केला जाणार नाही. अशा प्रकारची कामे रद्द केली जातील. आत्तापर्यंत १०१कामे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. यापुढे देखील धोरण म्हणून याच पद्धतीने कामात बदल न करता ती रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

Back to top button