प्लास्टिकचा नव्हे, पोषकतत्वे असलेला फोर्टिफाईड तांदूळ | पुढारी

प्लास्टिकचा नव्हे, पोषकतत्वे असलेला फोर्टिफाईड तांदूळ

खानिवडे : पुढारी वृत्तसेवा : वसईतील रेशन दुकानांतून मिळणार्‍या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ असल्याचे निदर्शनास आल्याने लाभार्थ्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार वसईत उजेडात आला. मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसून पोषकतत्व असलेला फोर्टीफाईड तांदूळ आहे. मात्र शासनाकडून या बाबत जनजागृती झाली नसल्याने लाभार्थ्यांमध्ये चलबिचल होत असून लाभार्थी संभ्रमात आहेत .

शिधापत्रिका धारकांना वाटप केल्या जाणार्‍या धान्य वाटपात आता पोषकतत्वे असलेल्या फोर्टिफाईड तांदळाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु याबाबत धान्य वितरण केल्या जाणार्‍या केंद्रावर जनजागृती न केल्याने हा तांदूळ प्लास्टिकचा असल्याचा समज होऊन नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य वितरण केले जाते. वसईत यासाठी विविध ठिकाणी शिधा वाटप केंद्र तयार केली आहेत.180 शिधावाटप केंद्र असून त्यात अंत्योदय शिधापत्रिका 3 हजार 719, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक 1 लाख 32 हजार 600 हे शिधापत्रिका धारक लाभार्थी आहेत. दर महिन्याला वसई विरार मध्ये साधारणपणे 27 हजार क्विंटल इतका तांदूळ वितरित केला जातो.

वाटप केल्या जाणार्‍या तांदळात आता फोर्टिफाइड तांदूळ मिश्रित करून दिला जाऊ लागला आहे. आहारामधील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी हा तांदूळ उपयुक्त असून या तांदळामध्ये आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड विटामिन बी 12, झिंक विटामिन ए, विटामिन बी 1, बी2,बी5,बी 6 या पोषक घटकांचा समावेश आहे. नियमित तांदूळ व फोर्टिफाईड तांदूळ याचे प्रमाण 1 किलो तांदळात 10 ग्रॅम अशा प्रमाणात टाकण्यात आला आहे. याआधी शालेय पोषण आहारात शालेय विद्यार्थ्यांना हा तांदूळ दिला जात होता. आता सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतही या तांदळाचा समावेश करून त्याचे वाटप केले जात आहे.

फोर्टिफाइड तांदळाचे दाणे हे वजनाने हलके असल्याने पाण्यावर तरंगतात तर दुसरीकडे इतर दाण्यापेक्षा ते वेगळे ही दिसतात. अनेकदा नागरिकांकडून प्लास्टिकयुक्त किंवा भेसळयुक्त तांदूळ दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येते आहेत. नुकताच नायगाव कोळीवाडा येथील शिधा वाटप केंद्रावर ही प्लास्टिकचा तांदूळ दिला जात असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली होती. याबाबत जनजागृती व अनेक लाभार्थ्यांना याची माहिती नसल्याने संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.

शिधा केंद्रांवर जागृती व्हावी…

पोषण आहाराच्या दृष्टीने पोषकमूल्ये व गुणवत्ता पूर्ण असा हा तांदूळ आहे. परंतु लाभार्थ्यांना त्याची योग्य ती माहिती पुरवठा विभागाकडून दिली जात नाही. या जनजागृतीच्या अभावामुळे अनेकजण संभ्रमित होत आहेत. यासाठी शिधावाटप केंद्रावर तांदळाचा फोटो व त्यांची माहिती देणारा फलक लावणे, नागरिकांना माहिती देणे अशा प्रकारची जनजागृती करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

नागरिकांना या तांदळाची माहिती मिळावी यासाठी शिधा वाटप केंद्रातील दुकानदारांना जनजागृती पर फलक दुकानाबाहेर लावण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत.
– डॉ.अविनाश कोष्टी, तहसीलदार वसई

Back to top button