पालघर : प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी निलेश सांबरेंचे प्रकल्पग्रस्तांसह आमरण उपोषण | पुढारी

पालघर : प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी निलेश सांबरेंचे प्रकल्पग्रस्तांसह आमरण उपोषण

पालघर ; पुढारी वृत्तसेवा पालघर जिल्ह्यावर आजपर्यंत प्रकल्प लादले गेले. मात्र, प्रकल्पग्रस्तांवर व पालघरवासियांवर कायम अन्याय झाला. या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी प्रकल्पग्रस्तांसह आज (बुधवार) पासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी अध्यक्ष वैदही वाढाण, जि. प. सदस्य हबीब शेख, भगवान सांबरे, महेंद्र ठाकरे, जिजाऊ तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, काँग्रेस नेते सचिन शिंगडा यांच्यासह पालघर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी व प्रकल्पग्रस्तांनी हजेरी लावत आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला. अपेक्षित उत्तर मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असेही सांबरे म्हणाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो आदिवासी बांधव उपोषणस्थळी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील बहुतांश भाग आदिवासी, दुर्गम व डोंगराळ असून, येथे गेल्या 45 वर्षांपासून येथे आदिवासी उपाययोजनेतून अनेक धरणे बांधण्यात आली. आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हुकूमशाही पद्धतीने प्रकल्प लादण्यात आले. अनेक प्रकल्प अपूर्ण असूनही कागदोपत्री पूर्ण दाखवून त्यावर ठेकेदार व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. आज 45 वर्षांपासून आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. याबाबत वारंवार तगादा लावून, बैठका घेऊन, आंदोलने करूनही गरीब आदिवासी बांधवांना न्याय मिळू शकला नाही. सन 2014 साली पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊनही आदिवासी बांधवांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार, वीज, पाणी व प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या याबाबत प्रशासनाकडून अत्यंत उदासीनता दिसून येत आहे. याच आदिवासी, प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि पालघरवासीय जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी आजपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

निलेश सांबरे यांच्यासोबत बांधकाम व आरोग्य सभापती संदेश ढोणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट, जिजाऊ संस्था सचिव केदार चव्हाण, प्रवक्ते मोनिकाताई पानवे, साखरे ग्रामपंचायत सरपंच सौ. निता वाघेरा, साखरे गावचे बाधित शेतकरी सदाशिव भोये व दिलीप भोये, खुडेद – कुंडाचा पाडा येथील बाधित शेतकरी नंदू सोनू बारी व विश्वनाथ बाळू बरफ, वनई- चंद्रनगर ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच कामिनी जनाठे व सदस्य प्रताप सांबर, वसुरी ग्रामपंचायतचे सरपंच स्वाती सहारे, आलोंडे ग्रामपंचायतच्या सरपंच साधना दाताळे, अल्पसंख्याक युवक अध्यक्ष नवशाद मुखतार शेख, विक्रमगड नगरपंचायतचे नगरसेवक अर्चना लोहार व निमा महाले, गूंज शाखाध्यक्ष पंकज पाटील, जिजाऊ सदस्य अझहर ईरफान शेख आदी प्रकल्पग्रस्त व पदाधिकारी पालघर जिहाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button