कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : राज्यप्राण्याला लाभतोय सुरक्षित अधिवास, शेकरुंच्या संख्येत वाढ

नाशिक : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वृक्षाच्या शेंड्यावर शेकरूंनी तयार केलेले घरटे.
नाशिक : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वृक्षाच्या शेंड्यावर शेकरूंनी तयार केलेले घरटे.

नाशिक : नितीन रणशूर
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचा राज्यप्राणी अर्थात शेकरूला कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात सुरक्षित अधिवास लाभत आहे. वन्यजीव विभागासह स्थानिक आदिवासींना देवराई असलेल्या जंगल परिसरातील मानवी हस्तक्षेप रोखण्यात यश आल्याने शेकरूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे यंदाच्या प्रगणनेतून समोर आले आहे. या प्रगणनेत 50 पेक्षा जास्त शेकरूंची प्रत्यक्ष नोंद करण्यात आली आहे.

शेकरूंची प्रगणना करताना वनकर्मचारी.
शेकरूंची प्रगणना करताना वनकर्मचारी.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेकरू आपली घरटी तयार करतात. दुर्मीळ तसेच शेड्युल एकमध्ये असलेल्या शेकरूची वन्यजीव विभागाकडून मे महिन्याच्या शेवटच्या, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रगणना केली जाते. यंदाही वनकर्मचार्‍यांच्या मदतीने कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील राजूर आणि भंडारदरा वनपरिक्षेत्रामध्ये शेकरू गणना पार पडली. प्रत्यक्ष जंगलात फिरून वनकर्मचार्‍यांनी प्रगणनेचे काम पूर्ण केले. त्यात अभयारण्यामध्ये शेकरूचा अधिवास वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आंबा, चांदा, करंबू, आळीव, करप, जांभूळ, चांदडा, हिरडा, लांद, कोभोळ, आवळा, येडळा, गेळ, उंबर, शंदरी, गुळचाई, कोकेरी आदी वृक्षांच्या प्रजाती आढळणार्‍या राजूर व भंडारदरा परिक्षेत्रात शेकरूंची घरटी आढळून आली. वनकर्मचार्‍यांनी जीपीएस यंत्राच्या मदतीने शेकरूंच्या घरट्यांच्या नेमक्या जागांचीही नोंद घेतली. राजूर वनपरिक्षेत्रात नवी 177, जुनी 135 घरटी, तर 42 घरटी शेकरूंनी सोडून दिल्याचे आढळले. भंडारदरा वनपरिक्षेत्रात नव्याने 65 घरटी शेकरूंनी बांधल्याचे प्रगणनेत आढळून आले, तर जुनी 46 घरटी आढळून आली.

वनकर्मचार्‍यांना प्रगणनेत प्रत्यक्ष शेकरूंचे दर्शन झाले. विशेषत: राजूर वनपरिक्षेत्रातील कोथळे, तळे, पाचनई, कुमशेत या गावांतील जंगलामध्ये शेकरूंची संख्या अधिक आहे. त्यामध्ये कोथळे येथे स्थानिक आदिवासींनी राखून ठवलेल्या देवराईमध्ये सर्वाधिक 22 शेकरू दिसून आले आहेत. त्यापाठोपाठ तळे 13, पाचनई 9 आणि कुमशेतमध्ये 3 शेकरू नोंदविण्यात आले. लव्हाळी कोतूळ येथे शेकरूचे दर्शन वनकर्मचार्‍यांना होऊ शकले नाही. भंडारदरा वनपरिक्षेत्रातही शेकरूंचे वास्तव्य आढळून आले.

खासगी क्षेत्रात शेकरूंचे दर्शन

स्थानिक आदिवासींनी राखून ठवलेल्या देवराईमध्येही शेकरू आढळल्याची नोंद प्रगणनेत करण्यात आली. सोबतच भंडारदरा धरण क्षेत्रालगत खासगी क्षेत्रांमध्येही स्थानिकांनी विविध वृक्षांचे संवर्धन केले आहे. त्यामुळे या परिसरातही शेकरू आढळून येत असल्याने, त्याला पर्यटकांची पसंती मिळत आहे, तर गैरप्रकार रोखण्यासाठी वन्यजीव विभागाकडून राखीव वनक्षेत्रांसह खासगी क्षेत्रांवर वॉच ठेवण्यात येत आहेे.

शेकरूंचे दर्शन

कोथळे-22

तळे-13

पाचनई-09

कुमशेत-03

राजूर वनपरिक्षेत्रातील स्थिती

नवीन घरटी-117

जुनी -घऱटी-135

सोडलेली घरटी-42

प्रत्यक्ष दर्शन -47

सुरक्षित वातावरणामुळे शेकरूंच्या संख्येत वाढ…
जंगलातील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांचा वावर कमी झाल्याने शेकरूंना दोन वर्षे मुक्त वावरता आले. रतनगड व कोळटेंभे यासारख्या देवराई प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. सुरक्षित वातावरण निर्माण झाल्याने शेकरूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
-गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news