बालभारतीचीही आता स्वाध्यायपुस्तिका | पुढारी

बालभारतीचीही आता स्वाध्यायपुस्तिका

कसबा बावडा : पवन मोहिते
शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नव्याने इयत्ता 8 वी ते 12 वीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्यायपुस्तिका कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या आहेत. या स्वाध्यायपुस्तिकेमुळे पाठाचा आशय विद्यार्थ्यांना सहज अवगत होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनास चालना मिळावी व लेखनाचा अधिकाधिक सराव व्हावा, या हेतूने स्वाध्यायपुस्तिकेची रचना करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास मंडळातील तज्ज्ञ पुस्तकांची निर्मिती करत असतात. याच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना अल्पदरात दर्जेदार स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध करण्यात आली आहे. यावर्षीपासून या स्वाध्यायपुस्तिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अध्ययनाचा स्तर वाढविणे, प्राप्त माहिती लिखित स्वरूपात प्रकट करणे, विचार प्रक्रिया विकसित करणे हा स्वाध्यायपुस्तिका देण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या स्वाध्यायपुस्तिकेमध्ये विविध प्रश्नप्रकारानुसार प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्नांची रचना ही कृती केंद्रित ठेवण्यात आली आहे. स्वाध्यायपुस्तिकेमध्ये स्वाध्यायाच्या प्रश्नांबरोबरच प्रत्येक पाठाचा संक्षिप्त गोषवारा संकल्पनाचित्रे या माध्यमातून प्रत्येक पाठातील महत्त्वाचे मुद्दे व उदाहरणे स्वाध्यायांच्या सुरुवातीलाच दिली आहेत. पाठाचा आशय विद्यार्थ्यांना सहज अवगत होण्यास यामुळे मदत होणार आहे. 7 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिकेची (प्रात्यक्षिक नोंदवही) सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आले पण कोरोनामुळे त्याचा अपेक्षित प्रसार झाला नाही. या प्रात्यक्षिक नोंदवहीचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे.

विद्यार्थ्यांची क्रमिक पुस्तके तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती असते, समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना यावर्षीपासून अल्पदरात स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वाध्याय पुस्तिकांमुळे संपूर्ण पाठाचा आशय विद्यार्थ्यांना सहजपणे अवगत होण्यास मदत होईल.
— के. बी. पाटील, संचालक, बालभारती, पुणे

Back to top button