लवंगी मिरची : चार दिवस कामाचे!

लवंगी मिरची : चार दिवस कामाचे!

काय गण्या? विलायतेला जायची तयारी झाली का?
नाही रे पद्या.
कुठे अडलंय ते व्हिसाबिसाचं खटलं?
ते नाही अडलं. मीच विचार बदललाय.
का? शेवटी नांगी टाकायचीच होती तर आधी कशाला बढाया मारल्यास? मी परदेशी निघालो, चाललो, गेलोच वगैरे?
बढाया नाय रे! पण, युरोपचं आकर्षणच संपलं ना?
का? सगळ्या गोर्‍या बाया काय बुरखे पांघरायला लागल्या की अचानक अंगभर कपडे चढवायला लागल्या?
तुझी झेप तेवढीच रे! मला जायचं होतं ते तिकडल्या चार दिवसांच्या आठवड्यासाठी.
होय काय? तिथे आठवडा न म्हणता चारवडा म्हणणार आहेत वाटतं?
जगातल्या अनेक देशांनी चार दिवस काम आणि तीन दिवस घरी थांबणं, अशी वाटणी करायचं ठरवलंय!
बाबो, कसले प्रेमळ देश आहेत ना ते? कामगारांचे जीव जाणतात, आठवड्यात तीन दिवस घरी बसा म्हणतात. नाही तर आपल्याकडे? शनिवारी काम संपवता आलं नाही, तर रविवारी चार तास जायला लावतात. याबाबतीत तरी परदेशांचं अनुकरण करा म्हणावं.
तेच झालं ना! एक जुलैपासून नवे कामगार कायदे आणताना 'चार दिवस कामाचे' असं धोरण राबवण्याचा विचार आपलं सरकारही करतंय म्हणे!
भले! कधीतरी सरकारलाही बरी बुद्धी सुचते.
नुसती बरी नव्हे, फायद्याची ठरतेय ही योजना जगभर.
कमी कामात जास्त फायदा? मला तर काही टोटल लागत नाही याची.
कारण तू पेपर वाचत नाहीस. सगळी माणसं, सगळे दिवस, रोज घराबाहेर पडतात तेव्हा वाहनांसाठी खूप इंधन जळतं, वाहनं आणि रस्ते झिजतात, माणसांचा बराच वेळ आणि शक्ती जाण्यायेण्यात संपते.. वगैरे अभ्यास झालाय.
होय रे! एकेकदा कारखान्यात पोहोचेपर्यंतच जीव अर्धा होतो माझा. पोहोचल्यावर पंधरा मिनिटे स्वस्थ बसून मगच कामात हात घालतो.
मग तरी घालतोस का इमानाने?
मग, कंपनी काय उगाच पोसते का मला? मी काय जावई लागून गेलोय त्यांचा?
तसे तर आपण सगळे कंपन्यांचे जावई असल्यासारखेच वागतो नाही का? कामाला कधीमधी, सवलतीला सर्वात आधी! मालकाला 'ब्र' काढू द्यायचा नाही. युनियन असतेच पाठीशी!
ते राहू दे रे! आता आपल्याकडेही 'चार दिवस कामाचे' असं होतंय ही ब्येस बातमी दिलीस बघ.
इतरही सेवानियम बदलणार आहेत म्हणे! सुट्ट्यांचे नियम बदलणार, पी.एफ. वाढवणार. फक्त एक अट आहे, कामाच्या चार दिवसांत आठवड्याचंच नव्हे, तर त्याहून जास्त उत्पादन दिलं पाहिजे.
ती काय जादूची कांडी आहे का?
ती असो, नसो! कामचुकारपणा सोडावा लागणार.
कोण असतं कामचुकार?
आपण सगळेच. रोज आठ-नऊ तासांच्या नोकरीत चार-साडेचार तासच काम करतो आपण, तेही केलं तर!
मग, यापुढे नऊ नऊ तास मान मोडून कामं करणार?
करावेच लागणार. मी तरी तशी मानसिक तयारी करायला लागलो आहे. 'चार दिवस कामाचे, बाकीचे आरामाचे, नको आम्हाला कोणाचेही, पैसे हरामाचे!'

– झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news