चेंबूरमध्ये दरडींचा धोका कायम | पुढारी

चेंबूरमध्ये दरडींचा धोका कायम

मुंबई : प्रसाद जाधव :  चेंबूरच्या वाशीनाका भारतनगरमधील भीम टेकडीत दरवाजा तोडून दरड थेट झोपडीत कोसळल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील अरविंद प्रजापती (24), आशिष प्रजापती (20) ही दोन तरुण मुले जखमी झाली आहेत. या घटनेमुळे मागील वर्षी या ठिकाणी दरड कोसळून 19 जणांचा मृत्यू झाल्याच्या आठवणी ताज्या झाल्याने परिसरातील लोक भयभीत झाले आहेत.

आशिषवर प्राथमिक उपचार करून त्याला सोडण्यात आले. तर, अरविंद याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिली. भारतनगर भीमटेकडी येथील झोपडपट्टीत अशोक प्रजापती आपल्या कुटुंबासोबत राहतात. रविवारी पहाटे 4 च्या दरम्यान प्रजापती कुटुंबीय साखर झोपेत असताना बीआरसीच्या डोंगरातून एक भला मोठा दरड संरक्षण भिंत छेदून अशोक प्रजापती यांचा दरवाजासकट घरामध्ये कोसळला. आजूबाजूच्या रहिवाशांनी प्रजापती यांच्या घराकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले.

प्रजापती कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र यामध्ये अशोक प्रजापती यांचा मोठा मुलगा अरविंद प्रजापती व लहान मुलगा आशिष प्रजापती हे जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरड बाजूला केल्या. भारतनगरातील बंजारा तांडा, भीम टेकडी, समता चाळ, गणेश टेकडी, साई टेकडी, हशु अडवाणी नगरात सुमारे 650 झोपडीधारक धोकादायक अवस्थेत राहत असून प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना होतात. मागील वर्षी 18 जुलैला ढगफुटी होऊन भीमटेकडीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बंजारा तांडा व समता चाळ येथे दरड कोसळून 19 जणांचा बळी गेला होता. या घटनेला 11 महिने झाले असताना रविवारी पुन्हा दरड कोसळल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. मागील वर्षीच्या दुर्घटनेनंतर पालिकेने धोकादायक स्थितीत राहत असलेल्या 38 झोपडीधारकांचे तात्पुरते विष्णूनगर येथील पुनर्वसन ंइमारतींमध्ये स्थलांतर केले होते. या ठिकाणी पावसाळ्यात वारंवार घटना घडत असल्याने धोकादायक स्थितीतील 650 झोपडीतील जवळपास तीन ते साडेतीन हजार नागरिकांचा जीव वेशीला टांगला आहे.

पालिका प्रशासन पावसाळ्याच्या आधी नोटीस देऊन झोपड्या रिकामी करायला सांगतात. गोरगरीब हातावर पोट असलेले जाणार कुठे? असा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान केंद्र व राज्य शासनाने डोंगरावर राहणार्‍या धोकादायक झोपडीधारकांसाठी एक स्वतंत्र धोरण तयार करावे व त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन इमारतींमध्ये करावे अशी मागणी शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी शासनाकडे केली आहे.

पहाटे भला मोठा दगड दरवाजा तोडून घरामध्ये शिरला. माझी दोन मुले जखमी झाली आहेत. घराचे देखील फार नुकसान झाले आहे. आमची परिस्थिती हलाखीची असल्याने दुसरीकडे कुठे घर घेऊ शकत नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊन आम्हाला या ठिकाणी राहावे लागते.

– अशोक प्रजापती, दुर्घटनाग्रस्त झोपडीधारक

भारतनगर, विष्णूनगर येथील डोंगरालगतच्या झोपडीधारकांचे पावसाचे चार महिने माहुल किंवा विष्णूनगरला एमएमआरडीएने बांधलेल्या इमारतीत स्थलांतर करावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पालिका उपायुक्त विेशास शंकरवार यांच्या दालनात 30 मे रोजीबैठक झाली. याविषयी प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– निधी शिंदे, स्थानिक माजी नगरसेविका

Back to top button