नाशिक : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | पुढारी

नाशिक : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

देवळा; पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रसार माध्यांमाना दिली. चव्हाण यांनी या घोषणेनंतर मतदारसंघात गाठी भेटी देखील सुरू केल्या. त्यांनी दिलेल्या या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यामुळे आता चव्हाण यांच्या भूमीकेकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी वंचित आघाडी, बसपा, पदाधिकारी मनधरणी करीत असल्याची चर्चा आहे. दिंडोरी मतदार संघातील मनसे कार्यकर्ते चव्हाणांना गळ घालत आहेत. मात्र हरिश्चंद्र चव्हाणांच्या गोटातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच पत्ते उघडे करू असे सांगीतले जात आहे.

चव्हाण यांच्या गुप्त बैठकांचे राज काय?

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजप उमेदवारास पाठिंबा नसल्याचे सांगून बंडखोरीचे संकेत दिल्याने भाजपात प्रचंड खळबळ उडाली होती. भाजप कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा विरोध असताना भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने चव्हाण संतप्त झाले आहेत. त्यांनी गनिमी काव्याने भाजपाच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकांचा सपाटा लावला असल्याचे समजते.

द्राक्ष, कांद्याचा ज्वलंत प्रश्न सोडविता आला नसल्यामुळे कार्यकर्ते फक्त भाजपाच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी वरवर फिरल्या सारखे दाखवत आहेत. तर काम मात्र चव्हाणांचे करीत असल्याचे उघड सांगत आहेत.

आपण जनरेट्यामुळे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरुच ठेवल्याने भाजप गोटात अस्वस्थता पसरली आहे.

Back to top button