Nashik Fraud News : शेअर मार्केटचे आमिष दाखवून तरुणांना २५ लाखांस गंडा | पुढारी

Nashik Fraud News : शेअर मार्केटचे आमिष दाखवून तरुणांना २५ लाखांस गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने भामट्यांकडून गंडा घातला आहे. शहरातील उच्चशिक्षित, ज्येष्ठ नागरिकांना भामटे लक्ष करीत असून, त्यांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक करीत आहे. नाशिक रोड येथील जय भवानी रोडवरील युवकासह दोघांना भामट्यांनी २५ लाख ३१ हजार ६८७ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार भामट्यांनी त्यांना व नीलेश खर्डे यांना आॅगस्ट २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत फसवले. भामट्यांनी विशाल व नीलेश यांच्यासोबत व्हर्च्युअल मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. त्यात व्हॉट्सअॅपवरून वेगवेगळ्या नावे संपर्क साधून भामट्यांनी दोघांना गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार विशाल व नीलेश यांनी टप्प्याटप्प्याने लाखाे रुपयांची गुंतवणूक केली. भामट्यांनी त्यांना गुंतवणूक केल्याचे भासवून नफा मिळत असल्याचे सांगितले. मात्र, विशाल व नीलेश यांनी पैसे मागितले असता भामट्यांनी ते देण्यास नकार दिला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. यात विशाल यांची सुमारे १६ लाख रुपये, तर नीलेश यांची ९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यानुसार विशाल व नीलेश यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना गुंतवणुकीस प्रोत्साहित करणाऱ्यांसोबत ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले आहेत त्या खातेधारकांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button