नाशिक : विठेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन | पुढारी

नाशिक : विठेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

देवळा; पुढारी वृत्तसेवा : विठेवाडी व झिरेपिंपळ शिवारातील शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज (दि.१५) आंदोलन केले. प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

‘ज्यांनी केली वारंवार शेतीमालाची निर्यात बंदी, त्यांनाच आता मतदान बंदी’, अशा आशयाचा फलक लोहणेर – कळवण या राज्य मार्गांवरील विठेवाडी येथील चौफुलीवर लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. याला आपण सर्व ताकदीनिशी विरोध करुन येणाऱ्या निवडणुकीत आपली संघटीत ताकद दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी यावेळी केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निंबा निकम, प्रविण निकम यांच्या शिवप्रेमी मित्रमंडळाने लक्षवेधी फलक लावले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम, मिलिंद निकम, नंदकिशोर निकम, संजय निकम, तानाजी निकम, संजय सावळे, ललित निकम, ईश्वर निकम, लहानु निकम स्वप्निल निकम, रावसाहेब निकम, पिंटु निकम, कैलास कोकरे, बंडु आहेर, बंटी आहीरे, योगेश हिरे, मधुकर निकम, आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button