धुळ्यात अजित पवार गटाच्या बैठकीत दोन गटांमधील वाद उफाळला | पुढारी

धुळ्यात अजित पवार गटाच्या बैठकीत दोन गटांमधील वाद उफाळला

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत रविवारी (दि. ३१) दोन गटांमधील वाद उफाळून आला. विशेषता राज्याचे मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर चांगलीच खडाजंगी उडाली. त्यामुळे मंत्री पाटील देखील हतबल होऊन दोन गटांमधील हा वाद पाहत होते. अखेर यापुढे प्रत्येकाला विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिले गेल्याने या वादावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला. धुळ्यातील तालुका आणि शहर कार्यकारिणी मधील हा वाद भविष्यात कळीचा मुद्दा ठरू नये, यासाठी पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात आली.

धुळे शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकी संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .ही बैठक सुरू होताच काही वेळातच शहर कार्यकारिणीच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजीचा सूर व्यक्त करीत मंचाच्या समोर आपली कैफियत मांडण्यास सुरुवात केली. धुळे जिल्ह्यातील काही पदाधिकारी शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. महत्त्वाच्या बैठकांना बोलावले जात नाहीत, असा उघड आरोप मंत्री पाटील यांच्यासमोर करण्यात आला. या प्रकारामुळे कार्यक्रमांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्याचप्रमाणे मंचावर बसलेल्या तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील गोंधळ निर्माण झाला. मंत्री पाटील यांनी काही वेळ या कार्यकर्त्यांना हात उंचावून शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र गटबाजीच्या विरोधात कार्यकर्त्यांनी आपला नाराजीचा सूर सांगणे सुरूच ठेवले. त्यामुळे कार्यक्रम बराच वेळ थांबून राहिला. अखेर नाराज कार्यकर्त्यांना या पुढील कालावधीमध्ये प्रत्येकाला विश्वासात घेतले जाईल, यासाठी वरिष्ठ पातळीवरून विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले त्यामुळे तूर्त या वादावर पडदा पडला. मात्र कार्यक्रमात आलेल्या महिला कार्यकर्त्या आणि अन्य पदाधिकाऱ्यांमधून मात्र निराशेचा सूर व्यक्त करण्यात आला. एकीकडे अजित पवार गटाची पक्ष बांधणी करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असताना तालुका आणि शहर पदाधिकारी आपसात भिडणार असतील तर भविष्यात हा मुद्दा कळीचा ठरू शकतो. यासाठी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच लक्ष घालून गटबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली.

Back to top button