जळगाव : डॉक्‍टर असल्‍याचे भासवून सोनाराची पन्नास हजाराची फसवणूक | पुढारी

जळगाव : डॉक्‍टर असल्‍याचे भासवून सोनाराची पन्नास हजाराची फसवणूक

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

डॉक्टर असल्याचे भासवून सोनाराला ५० हजाराला फसवून अज्ञात भामट्याने धुम ठोकली. ही घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील रथगल्ली येथील मयुर प्रकाशचंद जैन (वय ३३) हे सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांचे दुकान रथगल्ली येथे आहे. दरम्यान ७ जानेवारी रोजी सकाळी ११:४० वाजण्याच्या सुमारास मयुर प्रकाशचंद जैन यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तेव्हा मी शिवशक्ती इस्पितळातून असिस्टंट डॉ. एस.के.जैन बोलत आहे. माझ्या घरी कार्यक्रम असल्याने मला एक तोळा सोन्याची चेन लागत आहे. त्यामुळे सोने घेऊन आपण शिवशक्ती इस्पितळात आल्यावर पैसे देतो असे सांगून त्यांनी फोन ठेवला.

त्यावर मयुर यांनी दुकानातील कारागीर मंगेश याला सोन्याची चैन घेऊन इस्पितळात जायला सांगितले. मंगेश इस्पितळात दाखल होताच मीच असिस्टंट डॉ. एस.के.जैन असून पैसे कॅबीनमधून घेऊन येतो. असे सांगून त्या भामट्याने चेन घेवून धुम ठोकली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयुर प्रकाशचंद जैन यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार सुरू आहे.

Back to top button