एकनाथ खडस यांच्याकडून जिवीतास धोका : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप | पुढारी

एकनाथ खडस यांच्याकडून जिवीतास धोका : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या परस्पर तक्रारीवरून वाद निर्माण झाला आहे. या वादात रोहिणी खडसे यांनी केलेल्‍या विधानावर आज सायंकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. आपल्या जिवीतास एकनाथ खडसे व ॲड. रोहिणी खडसे यांच्यापासून धोका असल्याची माहिती त्‍यांनी पोलिस प्रशासनाला दिली. याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात फेसबुकवरील एका पोस्ट वरून वाद निर्माण झाला. या वादातून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हेही दाखल झाले आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असता, असेच सुरु राहिले तरं उद्या आम्ही महिला या आमदाराला मारहाण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशा इशारा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दिला आहे.

आमदारांना चोप देणे ही एका गुंड प्रवृत्ती लोकांची भाषा असू शकते. आपण आमदार झाल्यापासून विराेधकांचे  कटकारस्थान आपल्या लक्षात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याबद्दल त्यांच्या मनात घृणा निर्माण झाली असून, ते माझा कधीही घातपात करतील हे सांगता येत नाही. माझे कुटुंब त्यांच्यापासून असुरक्षित असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. याबाबत लवकरच लेखी तक्रार करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button