Nashik News : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत श्यामराव भोसले ‘शिवबंधना’त | पुढारी

Nashik News : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत श्यामराव भोसले 'शिवबंधना'त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माजी मंत्री बबन घोलप शिंदे गटात प्रवेश करत असल्याने हादरा बसलेल्या शिवसेनेच्या उबाठा गटाला नाशिक रोड परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्यामराव भोसले यांच्या पक्षप्रवेशाने काहीसा दिलासा मिळाला आहे. भोसले यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधले.

उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, त्यांच्या सोबत असलेले माजी आमदार योगेश घोलप यांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी ठाकरे गटाने नाशिक रोड, देवळाली भागात पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या घोषित केल्या आहेत. त्यातच माजी मंत्री घोलप यांच्या शिंदे सेना प्रवेशाने ठाकरे गटात चिंतेचे वातावरण असताना भोसले यांनीही शिवबंधन बांधल्याने ठाकरे गटाला काहीसे बळ मिळणार आहे. प्रदीर्घ पोलिस सेवेतून निवृत्त झालेल्या भोसले यांचा नाशिक रोड, देवळाली कॅम्प भागात मोठा जनाधार आहे. देवी चौक भागातील एेतिहासिक बुध्दविहाराच्या जीर्णोध्दारात भोसले यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पक्षादेशाचे पालन करा. पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करून विजयी करा, असे आदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याचे भोसले यांनी सांगितले. भोसले यांच्यासमवेत बबलू सय्यद, राजेश जाधव, तेजस साळवे, आनंद पवार, मुकुंद गंडवाल आदींनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Back to top button