उत्तर महाराष्ट्रात सव्वातीन लाख लोक टँकरवर अवलंबून | पुढारी

उत्तर महाराष्ट्रात सव्वातीन लाख लोक टँकरवर अवलंबून

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीवरून राजकारण तापले असताना दुसरीकडे नाशिक विभागावर सूर्य कोपला आहे. उन्हाचा तीव्र तडाखा जाणवण्यासोबतच दुष्काळाच्या झळांनी जनता हैराण झाली आहे. सद्य:स्थितीत विभागात एक हजार 39 गावे व वाड्यांना तब्बल 319 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आजमितीस तीन लाख 27 हजार 613 लोकसंख्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एप्रिलच्या मध्यामध्ये विभागात टँकरचा फेरा सुरू झाला होता.

गेल्या आठ दिवसांपासून नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या तापमानामध्ये सरासरी 2 ते 3 अंशांची वाढ झाली आहे. जळगावमध्ये आताच पारा थेट 45 अंशांवर जाऊन पोहोचला आहे; तर विभागातील अन्य जिल्ह्यांमध्येही 40 ते 42 अंशांदरम्यान तापमान पोहोचले आहे. मार्च एंडला उन्हाच्या तडाख्याने अवघा उत्तर महाराष्ट्र भाजून निघत आहे.

वाढत्या उन्हाच्या तडाख्यासोबत ग्रामीण भागामध्ये पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष जाणवत आहे. हंडाभर पाण्यासाठी जनतेला मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. तसेच नाशिक, जळगाव, नगरसारख्या मोठ्या शहरांमध्ये अघोषित पाणी कपात सुरू आहे. 2023 मध्ये एप्रिलच्या 17 तारखेला विभागात पहिला टँकर सुरू करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा नाशिकसारख्या जिल्ह्यात डिसेंबर 2023 पासूनच टँकरचा फेरा सुरू झाला आहे. आजमितीस विभागात नंदूरबारवगळता अन्य जिल्ह्यात टँकर धावताहेत. नाशिकला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसत असून, जिल्ह्यातील सात तालुक्यांत 195 गावे व 436 वाड्यांना 207 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल नगरला 62, जळगावला 45 तर धुळ्यात 5 टँकर सुरू आहेत. याशिवाय त्या त्या जिल्हा प्रशासनांनी पाणीपुरवठ्यासाठी 138 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. दरम्यान, उन्हाळ्याचे एप्रिल व मे असे दोन महिने शिल्लक आहेत. त्यातच जिल्ह्यांमधील उपलब्ध साठा लक्षात घेता जनतेपुढे पाण्यासाठी टँकरशिवाय पर्याय उपलब्ध नसणार आहे.

धरणांमध्ये 39 टक्के साठा
नाशिक विभागात पाचही जिल्ह्यांमध्ये छोटे, मध्यम व मोठे अशी एकूण 537 धरणे आहेत. गेल्या काही दिवसांत या धरणांच्या पातळीत झपाट्याने घसरण झाली आहे. सद्य:स्थितीत ही सर्व धरणे मिळून 3 हजार 121 द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक असून त्याचे प्रमाण 39.18 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये 54.44 द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे 2023 च्या तुलनेत विचार केल्यास यंदा धरणांमध्ये 15.26 टक्के पाण्याची तूट आहे.

टँकरची स्थिती
जिल्हा गावे-वाड्या टँकर
नाशिक 631 207
नगर 365 62
जळगाव 38 45
धुळे 05 05
एकूण 1039 319

Back to top button