Dhule Leopard News : पाण्याच्या शोधात बिबट्याची मान अडकली हंड्यात, मोठ्या शर्थीने सुटका | पुढारी

Dhule Leopard News : पाण्याच्या शोधात बिबट्याची मान अडकली हंड्यात, मोठ्या शर्थीने सुटका

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या मादी बिबट्याची मान पाण्याच्या हंड्यात अडकल्याची घटना काल रात्री साक्री तालुक्यातील धुकशेवड गाव शिवारातील गोठ्यात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पिंजरा व पशुवैद्यकीय डॉक्टरांसह घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय यांनी भुलचे इजेक्शन देवून बिबट्याला बेशुध्द केले. त्यानंतर हंडा काढून बिबट्याची सुटका करण्यात आली. त्याला पिंजऱ्यात ठेवून जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती कोंडाईबारी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

साक्री तालुक्यातील कोंडाईबारी वन क्षेत्रातील जयराम नगर पैकी धुकशेवड शिवारातील कृष्णा नारायण चौरे (रा.देवळीपाडा) यांच्या शेतात गुरांच्या वाड्यात पहाटे दोन वाजेच्या सुमारास भक्ष व पाण्याच्या शोधात एक मादी ज बिबट्या आला. तांब्याच्या हंड्यात पाणी असावे म्हणून त्याने पिण्यासाठी मान आत घातली मात्र, त्याची मान या हंड्यात अडकली. त्यानंतर तो वाड्याच्या आजूबाजूला सैरावैरा पळत सुटला बिबट्या पूर्णतःहैराण होऊन दमुन वाड्यात जाऊन बसला.

ही घटना पाहून शेतमालकाने पहाटे तीन वाजता वन अधिकारी सविता सोनवणे यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यांनी ही बाब उपवनसंरक्षक नितीन कुमारसिंग यांना कळवून पिंजऱ्यासह वन कर्मचारी व वन्यजीव संस्था, पिंपळनेरचे पथक व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कापडणीस व त्यांचे कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिका-यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. बिबट्याची मान अडकल्यामुळे तो थकला होता. त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शनद्वारे भूल देऊन त्यास बेशुद्ध केले. पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला पिंपळनेर वनविभागाच्या आवारात आणले. या ठिकाणी साक्री तालुक्याचे पशुधन आयुक्त अधिकारी डॉ. योगेश गावित, डॉ.मंगेश हेमाडे, डॉ.संदीप कोकणी, डॉ.शंकर आस्वार, डॉ.राहुल पाटील यांनी या बिबट्यास पुन्हा इंजेक्शन द्वारा भूल दिली. बिबट्यास ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याची मान आतमध्ये अडकल्याने तो अतिशय बेभान झालेल्या असल्यामुळे शक्य झाले नाही. त्यानंतर येथील कारागीर मुस्ताक शेख यांनी कटरच्या साह्याने तांब्याच्या हंड्याला दोन ते तीन ठिकाणी चरे देऊन ऑक्सिजन आत पोहोचेल अशी योजना केली. बिबट्याला ऑक्सिजन मिळतात बिबट्या सुस्थितीत आला. एकीकडे हंडा पकडून व एका बाजूने बिबट्याची शेपूट पकडून हंडा ओढला असता बिबट्याची मान सुखरूप बाहेर निघाली

सुरक्षित सोडणार जंगलात

बिबट्याला आता पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची तब्येत आता चांगली आहे. या एक वर्षाच्या मादी बिबट्यास सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल अडकिने, वनाधिकारी सविता सोनवणे यांनी सांगितले.

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनकर्मचारी एस.जे.पाटील, निता.एन.मस्के, एस.आर. देसले,गणेश बोरसे, विजय राठोड, रोशना काकुस्ते, वनरक्षक अजित साबळे व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा :

Back to top button