Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम हटावसाठी प्रतीकात्मक तिरडी यात्रा | पुढारी

Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम हटावसाठी प्रतीकात्मक तिरडी यात्रा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ईव्हीएमविरोधात संविधान सन्मान वकील समितीतर्फे गुरुवारी (दि. २९) जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएमची प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली. यावेळी ईव्हीएम हटविण्यासंदर्भात जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देत, लोकसभेपासून सर्व निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी करण्यात आली.

संविधान सन्मान वकील समितीकडून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले. त्यात भारतात ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ईव्हीएमविरोेधी फलक हाती घेतले होते. त्यावर, लोकतंत्र की हत्या बंद कराे, ईव्हीएम को बॅन कराे; ईव्हीएमसे फिर एक बार लोकतंत्र हुआ शर्मसार, गली गली में शाेर है ईव्हीएम चोर है; मतदार राजा जागा हाे, लोकतंत्राचा धागा हो, अशा आशयाचा मजकूर लिहलेला होता. या फलकांनी सामान्यांचे लक्ष वेधून घेतले.

आगामी लाेकसभेपासून देशभरामध्ये सर्वच प्रकारच्या निवडणुका या मतपत्रिकेच्या माध्यमातून घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्याबाबत तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. तत्पूर्वी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ईव्हीएमची तिरडी यात्रा काढण्यात आली. त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर ही यात्रा पोहोचली. निवेदनावर ॲड. बंडूनाना डांगे, ॲड. प्रभाकर वायचळे, ॲड. राम बागूल, डॉ. संजय अपरांती, ॲड. अमोल परांडे, किरण गायकवाड यांच्यासह मोर्चेेकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button