Dhule News : आता शिवसेनेत कोणताही स्पीड ब्रेकर नाही ; कार्यकर्त्यांना श्रीकांत शिंदे यांचे आवाहन | पुढारी

Dhule News : आता शिवसेनेत कोणताही स्पीड ब्रेकर नाही ; कार्यकर्त्यांना श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा-पूर्वी शिवसेनेत महत्त्वाच्या पदापर्यंत जाण्यासाठी स्पीडब्रेकर टाकण्यात आले होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला महत्त्वाच्या पदावर जाणे शक्य आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी पक्षांमध्ये सर्वोच्च पदावर जाण्यासाठी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी धुळ्यात केले.

धुळ्यात आज जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी तयार केलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याबरोबरच चाळीस कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत, बांधकाम मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार मंजुळाताई गावित, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमानंतर शिवतीर्थ नजीक असणाऱ्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी शिवसेनेचे संजय वाल्हे, समाधान शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करीत खासदार शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत,, मंत्री दादा भुसे यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर झालेल्या सभेचे प्रास्ताविक जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी केले. या कार्यक्रमात त्यांनी धुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या यापूर्वी असलेल्या शक्तीचा ऊहापोह करीत येणाऱ्या निवडणुकीत आमदार, खासदार तसेच महानगरपालिकेवर देखील भगवा फडकणार असल्याचे सांगितले. त्यानंतर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचा राजकीय इतिहास हा फार मोठा आहे. यापूर्वी धुळ्यात शिवसेनेचा महापौर होता. त्यामुळे आता जनतेने पुन्हा एकदा सेनेचा महापौर बनवण्यासाठी शपथबद्ध झाले पाहिजे. शिवसेना नेहमी सामाजिक कामात अग्रेसर राहिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे धाडसी निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम केले पाहिजे. या जिल्ह्यात पुन्हा एकदा भगवी लाट आणण्यासाठी आपसातले मतभेद आणि गटबाजी संपवणे आवश्यक आहे. आपसातल्या गटबाजीचा फायदा विरोधकांना होऊ नये. यासाठी प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 16 महिन्यात विक्रमी निर्णय घेतले. हा विश्वविक्रम आहे. या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे धुळे येथील बस स्थानकासाठी जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे आपण चार कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

त्यानंतर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी धुळ्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यालयाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असून या स्मारकांमधील तोफेचे तोंड आपल्या कार्यालयाकडे आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून समाज काम करणाऱ्या प्रत्येकाने न्यायदानाचे काम केले पाहिजे. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची नजर आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. राज्यात यापूर्वीच्या शिवसेनेत महत्त्वाच्या पदापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिकांना जाण्यासाठी स्पीडब्रेकर टाकण्यात आले होते. मात्र आता सामान्य शिवसैनिक देखील राज्यस्तरावरील कोणत्याही पदापर्यंत पोहोचू शकतो. राज्यात वृद्ध, महिला तसेच वारकरी यांच्यासाठी सरकारने अनेक योजना केल्या. मराठा आरक्षणाचा शब्द पाळला. त्यासाठी सर्वे करून न्यायालयात टिकेल असेच आरक्षण दिले. आता कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर करून पक्षाची ध्येयधोरणे पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. शासन लोकापर्यंत पोहोचले. तर शिवसेनेची धोरणे आपोआपच प्रत्येक घरात पोहोचेल. प्रत्येक घरात शिवसैनिक तयार करण्यासाठी त्या घरात शासन आपल्या दारीची योजना पोहोचवण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

हेही वाचा

Back to top button