Nashik Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर वणवण भटकण्याची वेळ | पुढारी

Nashik Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर वणवण भटकण्याची वेळ

नांदगाव : सचिन बैरागी

नांदगावकरांवर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे सध्या तालुक्यात ४९ टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. ४७ गावे अन‌् २२२ वाड्या-वस्त्यांवर ११८ टँकर फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.   (Nashik Water Crisis)

गतवर्षी जिल्ह्याचे पर्जन्यमान घडले. नांदगाव तालुकाही त्यास अपवाद नाही. त्याचे परिणाम जाणवायला लागले आहेत. मुसळधार पावसाचे आवर्तनच न झाल्याने पावसाळा उलटण्यापूर्वीच विहिरी, नदी-नाले कोरडेठाक पडले होते. भूजलपातळी खालावल्याने काही गावांना पावसाळ्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. हिवाळा संपुष्टात येण्यापूर्वीच दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र झाली आहे. ठिकठिकाणाहून पाणी टँकरची मागणी होत आहे. येत्या काही दिवसांत गावागावांत पाणी टँकर धावू लागतील, अशी शक्यता आहे. (Nashik Water Crisis)

शहरातदेखील पाणीटंचाई (Nashik Water Crisis)

नांदगाव शहरालादेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने शहरातील ४४ भागांमध्ये क्रमनिहाय पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी तालुक्यातील दहेगाव, माणिकपुंज, गिरणा या तीन धरणांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत असते. परंतु, सध्या दहेगाव धरण कोरडे असल्याने, उरलेल्या दोन धरणांतूनच पाणी उपसा केला जात आहे.

त्यातही माणिकपुंज धरणातून शहराला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. तर गिरणा धरणातून सद्यस्थितीत महिन्यातून एकदाच शहराला पाणी मिळत असल्याने, पाणीटंचाईत भर पडली आहे. मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याने त्याच्या वितरणाची प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

========================

● एकूण टँकर संख्या : ४९

● पाणीपुरवठा गावे संख्या : ४७

● वाडी-वस्ती संख्या : २२२

● एकूण टँकर फेऱ्या : ११८

• अधिग्रहित विहिरी : ४

हेही वाचा ;

Back to top button