Dhule News | अक्कलपाडा योजना म्हणजे धुळेकरांची शुद्ध फसवणूक : माजी आमदार अनिल गोटे यांची टीका | पुढारी

Dhule News | अक्कलपाडा योजना म्हणजे धुळेकरांची शुद्ध फसवणूक : माजी आमदार अनिल गोटे यांची टीका

धुळे : पुढारी वृत्तसेवा- तापी नदीमध्ये शाश्वत पाणी असतांना पावसाच्या भरवशावर असणाऱ्या अक्कलपाडा योजना तयार करण्यात आली. या योजनेतून नैसर्गिक उताराने पाणी येणार नसून 250 अश्वशक्तीच्या पाच विज पंपांचा वापर करावा लागणार आहे. यासाठी 25 ते 30 लाखांची वीज बिलात भर पडणार आहे. अक्कलपाडा योजना ही धुळेकर जनतेची फसवणूक असल्याची टीका आज माजी आमदार अनिल गोटे यांनी केली.

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा योजनेची आज पाहणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह लोक संग्रामचे प्रशांत भदाणे, तेजस गोटे, विजय वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. धुळेकर जनतेला पाणीपुरवठा करणारी तापी पाणी पुरवठा योजना आणि अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना या तत्वता आणि गुणात्मक काही फरक नाही. तापी पाणी योजनेत पाणी उचलण्यासाठी 450 अश्वशक्ती क्षमतेचे पाच पंप लावण्यात आले आहे. या पंपाच्या माध्यमातून दररोज किमान 50 ते 60 एम एल टी म्हणजेच एक ते दीड एम सी एफ टी पाणी आणता येऊ शकते .त्याच्या वीज बिलाच्या साठी दरमहा 80 लाख रुपये खर्च येतो. तर नुकतीच 173 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या अक्कलपाडा योजनेत 250 अश्वशक्तीच्या पाच पंपांपैकी दोन किंवा तीन पंपांच्या माध्यमातून एक एमसीएफटी पाणी मिळते. यातून दरमहा किमान एक कोटी दहा लाख रुपये विज बिलाचा भुर्दड महापालिकेला बसतो आहे .तापी पाणीपुरवठा योजनेतून जामफळ शुद्धीकरण केंद्रापर्यंत 250 अश्वशक्तीच्या पंपांच्या मदतीने पाणी आणावे लागते .जामफळ पासुन नैसर्गिक उताराने धुळे शहराला पाणीपुरवठा होतो. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेतून पाणी शुद्ध करून धुळे शहराला पाणीपुरवठा केला जातो. एक एम सी एफ टी पाणी उचलण्यासाठी व जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत साधारणतः 25 ते 30 लाखांचा खर्च अनिवार्य आहे. अक्कलपाडा योजनेसाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र तापी योजना आणि या नवीन योजनेत कोणताही फरक दिसत नाही. अक्कलपाडा धरणातून मृत पाण्याचा साठा रिक्त करण्यासाठी केलेल्या सुविधेमधूनच धुळे शहराच्या दिशेने पांझरा नदीच्या पात्रातून पाईपलाईन केली असती तर नैसर्गिक उताराने व एक रुपयाही विजेचा खर्च न करता धुळे शहराला पाणीपुरवठा करता आला असता. विशेषता पांझरा नदीच्या पात्रात जलवाहिनी फोडण्याचा धोका देखील नसता. मात्र अक्कलपाडा योजनेची जलवाहिनी सुमारे 14 किलोमीटर फेऱ्याने धुळे शहराच्या दिशेने आणली गेली.या माध्यमातून अवास्तव खर्च करण्यात आला असल्याची टीका देखील गोटे यांनी केली. या योजनेसाठी 13 फेब्रुवारी 2019 रोजी तत्कालीन मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी 153 कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती. या योजनेत अचानक बदल करून 25 जुलै 2019 रोजी तब्बल वीस कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली. 173 कोटी चाळीस लाख एवढी प्रचंड किमतीची योजना तयार करण्यात आली. विशेषता दरवर्षी तीन कोटी 62 लाख 31 हजार रुपये डेडरगाव पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसेच सात कोटी 62 लाख 97 हजार एवढा देखभाल दुरुस्तीचा खर्च तापी पाणी योजनेसाठी गृहीत धरला आहे. यावरून नैसर्गिक उतार म्हणून प्रसिद्धी केलेल्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना व तापी पाणी पुरवठा योजना यात काहीही फरक नसल्याचे धुळेकर जनतेच्या लक्षात येईल.

वास्तविक पाहता तापी नदीमध्ये बारमाही पाण्याचा मोठा साठा उपलब्ध आहे. मध्य प्रदेशात पडलेल्या पावसाचे पाणी देखील तापी नदीच्या बॅरेजमध्ये साठते. त्यामुळे या नदीत शाश्वत पाणीसाठा आहे. तर अक्कलपाडा प्रकल्पात साक्री तालुक्यातील प्रकल्पामधील पाणी पांझरा नदीच्या माध्यमातून येते. पावसाने साक्री तालुक्यात पाठ फिरवल्यास अक्कलपाडा प्रकल्पात पाणीसाठा होण्यास अडचणी निर्माण होतील. यातून ही योजना अशाश्वत असताना त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. वास्तविक पाहता नकाणे तलावाची उंची वाढवणे तसेच डेडरगाव तलावातील गाळ काढून जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमता वाढवून उपाययोजना केल्याने धुळेकरांची पाणी समस्या कायमची मिटणे शक्य होते. पण केवळ आर्थिक लाभासाठी अक्कलपाडा योजनेसारखा पांढरा हत्ती पाळण्यात आल्याची टीका देखील यावेळी गोटे यांनी केली.

Back to top button