Nashik | यांना दिलंय धमकीपत्र; मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी  | पुढारी

Nashik | यांना दिलंय धमकीपत्र; मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धमकी आली म्हणून मी घरी बसणार नाही. अशा कितीही धमक्या आल्या आणि मारण्याचा प्रयत्न झाला, तरी मी माझी भूमिका सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मंत्री भुजबळ यांना शुक्रवारी (दि. 9) पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी धमकीचे पत्र पोलिसांच्या स्वाधीन करत तक्रार दाखल केली. तसेच माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

मंत्री भुजबळ म्हणाले, यापूर्वी दूरध्वनीद्वारे आणि संदेशांद्वारे अनेक धमक्या आल्या. त्यात आता पत्राची भर पडली आहे. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग आले परंतु, काहीही झाले, तरी मी माझी आयडॉलॉजी बदललेली नाही. मी घरी बसू शकत नाही. जे परिणाम होतील, त्यासाठी आपली तयारी आहे. आता पोलिसांवर सर्व सोडून दिले आहे. पोलिसांना सर्व माहिती दिली असून, पोलिस शोध घेतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री भुजबळ यांना प्राप्त झालेल्या पत्रात काही फोन नंबर तसेच काही गाड्यांचे नंबरही असून, हत्येच्या कटासाठी पाच लोकांची बैठक झाली. ही बैठक एका हॉटेलसमोर झाली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आल्याचे सांगत आता सर्व काही पोलिसांवर सोपवल्याचे म्हटले आहे.

मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी 
धमकीपत्रात मंत्री भुजबळ यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच भुजबळ यांना जिवे मारण्याची सुपारी पाच जणांनी घेतली आहे. त्यासोबतच हे पाचही जण सध्या भुजबळांच्या शोधात आहेत. ते केव्हाही त्यांना जिवे मारू शकतात. हे पाचही जण ज्यांनी भुजबळ यांची सुपारी घेतली आहे, ते सध्या गंगापूर, दिंडोरी, चांदशी येथील हॉटेलमध्ये बसून आहेत. या पाचही जणांना 50 लाख रुपयांना सुपारी देण्यात आली आहे. या गुंडांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा माफिया तुमचा गेम करणार असल्याचेही यामध्ये लिहलेले आहे. हे गुंड रात्रभर छगन भुजबळ यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे. या हल्ल्यासंदर्भातील चांंदशी परिसरातील हॉटेलमध्ये मीटिंग झाल्याचेही पत्रात नमूद आहे. तर हे पत्र तुमचाच हितचिंतक शिंदे देशमुख याचे असल्याचे पत्रात नमूद आहे.

Back to top button