Samode Gram Panchayat : घोडमाळ, टेंभारस्ता प्रभागात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी | पुढारी

Samode Gram Panchayat : घोडमाळ, टेंभारस्ता प्रभागात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी

पिंपळनेर (प्रतिनिधी): पिंपळनेर तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या नवापाडा रस्ता वसाहत, टेंभारोड व घोडमाळ या प्रभागात नागरिक सुविधांचा अभाव आहे. सांडपाणी, गटार व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट व पाणीपुरवठा या समस्यांनी नागरिक ग्रस्त आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायतने या सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांचा आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीस लेखी निवेदन दिले आहे.

सामोडे हद्दीतील टेंभारोड, घोड्यामाळ, लोणेश्वरी जवळील कचरा, सांडपाणी, लाईट, रस्ता या समस्या आजही कायम आहेत. टेम्बा रोडच्या कडेला मोठा खड्डा असल्यामुळे संपूर्ण परिसरातील सांडपाणी, घाण, प्लास्टिक कचरा गेल्या १५-२० वर्षांपासून तेथेच साचत आहे. सध्या तेथे अतिशय घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास, मच्छरांचे थैमान असून रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

या अस्वच्छतेमुळे येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाडी सुद्धा या परिसरात कधी फिरकत नाही. येथील सदस्य देखील या परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. पूर्ण सामोडे हद्दीतील सर्वात कचरामय परिसर हा झाला आहे. आता ग्रामपंचायत प्रशासनावर येथील नागरिक प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत.

ग्रामपंचायतने आत्तापर्यंत या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. परंतु सांडपाणी खड्ड्यात गोळा होऊन कचरा, प्लास्टिक सोडून तिथे दुर्गंधी पसरत आहे. कृपया १५-२० वर्षांपासून येथील नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. आपल्या सामोडे ग्रामपंचायतीचा परिसर आता तरी समस्यामुक्त व्हावा ही कळकळीची मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.

या परिसरात व प्रभागात ठिकठिकाणी मोठी कचराकुंडी ठेवून येथे जमा होणारा कचरा कमी होईल. दैनंदिन घंटागाडी येथे पाठवावी. सरपंच, उपसरपंच, येथील सदस्य व ग्रामसेवक आपण येऊन समक्ष येथील परिस्थिती बघावी. ही नम्र विनंती आहे. येत्या २६ जानेवारी २०२४ पर्यंत येथे सुविधांची पुर्तता करावी. अन्यथा २६ जानेवारी ग्रामसभेत सर्व नागरिक सहभागी होऊन ग्रामपंचायतला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टेंभा रोड, घोड्यामाळ या भागातील नागरिकांनी लेखी निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत:

  • या परिसरात घंटागाडी दररोज पाठवावी.
  • परिसरात विद्युत पोल टाकून पथदिवे लावावेत.
  • परिसरात होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी.
  • वरच्या गल्लीतून येणाऱ्या पाण्याची सोय करावी.

निवेदनावर किशोर श्रावण जगताप, मुक्तार शहा मुनाफ शहा, प्रल्हाद केंद्रे, सुरेखा मोरे, मुस्ताक शहा, शकुंतला जगताप, श्री बर्डे यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Back to top button