Nashik Leopard News : शेळीचा पाडला फडशा, मुसळगावात बिबट्याचा मुक्त संचार | पुढारी

Nashik Leopard News : शेळीचा पाडला फडशा, मुसळगावात बिबट्याचा मुक्त संचार

दातली (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; बिबटे हे मानवी वस्तीवर येऊन पाळीव प्राण्यांवर तसेच मानवावर हल्ले करू लागले आहेत. सिन्नर तालुक्यात दररोज कुठे ना कुठे  बिबट्याचे दर्शन होत असून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी खोपडी येथे बिबट्याने बालकावर हल्ला करत बालकाला जखमी केल्याची घटना ताजी असतानाच मुसळगाव परिसरात इंडियाबुल्स सेझच्या मोकळ्या जागेत सुरक्षारक्षकांना बिबट्या मुक्त संचार करत असताना दिसून आला होता. त्यानंतर काल (दि.८) रात्री आठ वाजेदरम्यान मुसळगाव येथे संतोष भगवान सिरसाठ यांच्या घरालगत गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करत शेळीचा फडशा पाडला. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

फर्दापूर येथेही नारळी मळा, रानडे वस्ती परिसरात रात्रीच्या व दिवसाच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. शेताला पाणी देण्यासाठी दिवसा विजेची समस्या असल्याने रात्री पाणी भरावे लागत असते. मात्र बिबट्याच्या दहशतीने शेतकरी रात्री पाणी भरण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. वनविभागाने या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button