Nashik : चांदवडला सोमवारी महाविकास आघाडीचा दुष्काळी मोर्चा | पुढारी

Nashik : चांदवडला सोमवारी महाविकास आघाडीचा दुष्काळी मोर्चा

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : चांदवड व देवळा तालुक्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती असताना राज्य शासनाने दोन्ही तालुके दुष्काळी घोषीत न करता हजारो शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या शेतकरी विरोधी सरकारला जाब विचारण्यासाठी अन् दोन्ही तालुके दुष्काळी घोषीत करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे सोमवार (दि. ६) रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास प्रांत कार्यालयावर ‘दुष्काळी मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, उत्तमबाबा भालेराव, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर यांनी दिली. (Nashik)

चांदवड व देवळा तालुक्यातील नदी, नाले, कोरडे ठाक पडले आहेत. पाऊस नसल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. पर्यायाने विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पर्यायाने पिण्याच्या पाण्याचा अन् जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळाची भयानकता बघता यावर्षी दोन ते तीन वेळेस पेरण्या करून देखील पिके उगली नाहीत हि वस्तुस्थिती आहे. असे असताना शासनाने दुष्काळ जाहीर करत असताना चांदवड व देवळा तालुके वगळले आहेत. यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या सोमवार (दि.६) रोजी भव्य असा दुष्काळी मोर्चा प्रांत कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या मोर्च्यासाठी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी गणूर चौफुली येथील शासकीय विश्रामगृह येथे जमण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष संजय जाधव, डॉ. सयाजीराव गायकवाड, विलास भवर यांनी केले आहे. (Nashik)

हेही वाचा :

Back to top button