खानदेशातील भालदेव उत्सवाची परंपरा ग्रामीण भागासह सीमावर्ती भागात आजही टिकून | पुढारी

खानदेशातील भालदेव उत्सवाची परंपरा ग्रामीण भागासह सीमावर्ती भागात आजही टिकून

धुळे (पिंपळनेर) : अंबादास बेनुस्कर

खानदेशात पोळापासून ते दिवाळीपर्यंत स्थानिक सण-उत्सवांची रेलचेल असते. “पोळा करी सण गोळा” ही ग्रामीण भागातील म्हण प्रचलित आहे. ग्रामीण भागात बैलपोळा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी भालदेवाची विधिवत स्थापना केली जाते. खानदेशात परंपरागत चालत आलेले अनेक सण उत्सव महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवरील गावांमध्येही आजही तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. सीमावर्ती भागात आजही भालदेव उत्सवाची अनोखी परंपरा टिकून आहे.

संबधित बातम्या :

श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा सण साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाला प्रारंभ होतो. सायंकाळी घराच्या समोर अंगणात चुलीतल्या राखेचे कुंपण आखले जाते. ज्या घरासमोर राखेचे कुंपण असते त्या घरात भालदेव बसला आहे असे समजले जाते.

विधिवत स्थापना झाल्यानंतर घरातील कुठलीही वस्तू विकली जात नाही किंवा बाहेर जाऊ दिली जात नाही. त्यामुळे देवाण-घेवाणचे सर्व व्यवहार बंद होतात. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे दुभत्या पशुंना देव मानण्याची परंपरा आहे. त्या देवतांची पूजा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. या काळात दुभत्या जनावरांचे संपूर्ण दूध घरातच ठेवले जाते. दुधापासून दही, ताक बनवले जाते. शेजाऱ्यांना व गल्लीतील लोकांना घरी बोलून ताक प्राशन करण्यात दिले जाते. परंतु हे दुधाचे पदार्थ दुसऱ्याच्या घरी दिले जात नाहीत.

भालदेवाचा उत्सव पाच, सात, नऊ दिवसांचा साजरा केला जातो. ज्या घरी दुभती जनावरे आहेत त्यांच्या घरी “ओला भालदेव” व ज्या घरी दुभती जनावरे नाहीत त्यांच्या घरी “कोरडा भालदेव” असतो.

शेवटच्या दिवशी रुईच्या पाच किंवा सात पानांवर गाईच्या शेणाचे गोळे करून ठेवले जातात. त्यावर नदीपात्रातील पांढऱ्या रंगाचे लहान दगड किंवा कवड्या ठेवल्या जातात. पूजेसाठी रुईची सात पाने ठेवून नदीपात्रातील वाळू किंवा लव्हाळी आणली जाते. त्यावर सात पुरणपोळ्या, सात सांजोऱ्या, सात पुडा, सात गणपती, सात पापड्या, त्यावर रुईची फुले ठेवून दहीभात ठेवून नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी दहीभात-सांजोरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबत केरसुणी व ताक बनवण्याची रही (रवी)ची पूजा केली जाते. अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 22 रोजी विसर्जन केले जाते.

या सणांची कुठल्याच दिनदर्शिकात नोंद नसली तरी हे सण-उत्सव रूढी-परंपरा जोपासताना नात्यागोत्यात परस्पर स्नेह निर्माण करून एक संघपणाची भावना त्यातून निर्माण होते.

हेही वाचा :

Back to top button