नाशिक : 105 वेळा रक्तदान, आंतरराष्ट्रीय विक्रमाला घातली गवसणी | पुढारी

नाशिक : 105 वेळा रक्तदान, आंतरराष्ट्रीय विक्रमाला घातली गवसणी

नाशिक, (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या वित्त विभागात कार्यरत उपकोषागार अधिकारी (सिन्नर) असलेले मखमलाबाद रोडवरील रहिवासी गजानन माधव देवचके यांनी त्यांचे १०५ वे रक्तदान नुकतेच पूर्ण केले. त्यांच्या या रक्तदानाच्या कार्याची दखल दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेव्दारे नुकतीच घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील शंभर पेक्षा जास्त (१०५) वेळा रक्तदान करणारा गट ‘ब’ संवर्गातील एकमेव राजपत्रित अधिकारी अशी नोंद होऊन दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे हा आंतरराष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावे घोषित करण्यात आलेला आहे. विक्रमाचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मेडल त्यांना विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त यांचे दालनात देण्यात आले.

देवचके यांनी या आंतरराष्ट्रीय विक्रमाला वयाच्या ४६ व्या वर्षी गवसणी घातलेली आहे. त्यांनी आतापर्यंत ४२ वेळा सिंगल डोनर प्लेटलेट व एकदा कोविड प्लाझमादेखील दिलेला आहे. देवचके हे नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीवर संचालकपदावर देखील कार्यरत आहेत. वरील १०० रक्तदान हे सलग एकाच रक्तपेढीत करण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी अनुक्रमे १०१ ते १०५ हे रक्तदान जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार येथे जाऊन पूर्ण केलेले आहे. नाशिक विभागातील पाचही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन सलगपणे रक्तदान पूर्ण करणारे ते पहिले राजपत्रित अधिकारी ठरले आहेत.

त्यांना कोविडयोध्दा, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस, शतकवीर रक्तदाता, पंचवटी गौरव, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव, अशा अनेकविध नामांकित पुरस्कारांनी गौरविलेले आहे. त्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ”जीवनदाता गौरव” पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.

वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरीबाबत वित्त विभागाच्या वतीने सन्मानित केलेले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (भाप्रसे) यांच्या हस्ते आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचा सत्कारदेखील करण्यात आला आहे.

भविष्यात विविध शासकीय प्रशिक्षण केंद्रे, महाविदयालये, आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांच्या माध्यमातून रक्तदानाबाबतचे प्रबोधन करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांची पत्नी अश्विनी यांनी १५ वेळा व त्यांची ज्येष्ठ कन्या अनुष्का हिने पाचवेळा रक्तदान केलेले आहे.

हेही वाचा :

Back to top button