Indian Economy News | चीनची अर्थव्यवस्था मंदावली! भारताची जगातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल : गीता गोपीनाथ | पुढारी

Indian Economy News | चीनची अर्थव्यवस्था मंदावली! भारताची जगातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल : गीता गोपीनाथ

पुढारी ऑनलाईन : भारत २०२७-२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ (IMF Deputy Managing Director Gita Gopinath)  यांनी म्हटले आहे. ‘इंडिया टुडे‘शी बोलताना त्यांनी वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेविषयी सकारात्मक भाष्य केले आहे. भारत या वर्षी जागतिक विकासात १५ टक्के योगदान देईल, असेही गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. (Indian Economy News)

“२०२७-२८ पर्यंत भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. या वर्षी जागतिक विकासात देश १५ टक्के योगदान देईल आणि भारत हा पुढील काही वर्षांमध्ये आर्थिक वाढीचा केंद्रबिंदू असेल,” असे त्यांनी नमूद केले आहे.

“यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे ६ टक्के वाढ अपेक्षित आहे आणि त्यासाठी सार्वजनिक गुंतवणूक आणि वापर खर्च हे दोन प्रेरक घटक असतील,” असे गीता गोपीनाथ म्हणाल्या. “आम्हाला अजूनही संरचनात्मक सुधारणांची गरज आहे जी खूप महत्त्वाची असणार आहे.” असेही त्यांनी सूचित केले आहे.

तसेच क्रिप्टो मालमत्तेचे नियमन कसे केले जाईल याविषयी बोलताना गोपीनाथ म्हणाल्या की, “केवळ नियामक पैलूच नाही तर मॅक्रो-आर्थिक परिणामांना एकत्र आणणे ही G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षतेची सर्वात मोठी उपलब्धी आहे.” “यामुळे एक चांगला रोडमॅप तयार झाला आहे, जो क्रिप्टो मालमत्तांच्या विविध समस्यांवर आणि त्यातील डेटावर प्रकाश टाकेल,” असेही त्यांनी सांगितले.

गोपीनाथ यांनी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, “भारत केवळ नाविन्यपूर्णतेच्या बाबतीतच नव्हे तर आर्थिक क्षेत्रातही आघाडीवरही आहे. भारत अंतराळ क्षेत्रात काय करतो याकडे भारत जगातील इतर देशांचे लक्ष वेधून घेत आहे.

गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर काय जोखीमा आहेत याचीही माहिती दिली. “मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांतील महागाई, रशिया-युक्रेन युद्ध आणि हवामानाशी संबंधित घटना या नाणेनिधीसमोरील धोके आहेत,” असे त्यांनी नमूद केले. महागाईवर बोलताना त्या म्हणाल्या, “महागाई कमी होत आहे ही चांगली बातमी आहे. तसे आम्हाला आशादायक संकेत मिळत आहेत.”

रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाशी संबंधित जोखमींबद्दल गोपीनाथ म्हणाल्या, “ऊर्जा आणि अन्नधान्याच्या किमतीवर याचा मोठा परिणाम दिसून येईल.” (Indian Economy News)

चिनी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे आणि असे दिसत आहे की, विशेषत: दीर्घकाळ त्यांच्या रिअल इस्टेट क्षेत्राला फटका बसला आहे.” “तरीही चीनकडे सर्व संसाधने आहेत ज्यामुळे तेथील परिस्थिती बदलू शकते आणि त्यांचे नुकसान भरून निघेल. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, चीनची अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे दिसते.”

दरम्यान, गेल्या शनिवारी गोपीनाथ यांनी X (पूर्वीचे Twitter) वर पोस्ट करत G20 च्या अध्यक्षपदाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते.

हे ही वाचा :

Back to top button