राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू | पुढारी

राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

राज्यात आतापर्यंत एकूण १६ ठिकाणी नाफेड कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे. नाशिक जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. २५) गोयल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली.

लासलगाव, पिंपळगाव बसवंत, विंचूर, अंदरसूल, मुंगसे, ताहाराबाद, नामपूर, मालेगाव, मनमाड, देवळा येथे खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली असून, उद्या येवल्यात नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात आता एकूण १६ ठिकाणी नाफेडच्या वतीने कांदा खरेदी केंद्रे सुरू असणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून २४१० रुपयांनी २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करत आहे. यासाठी राज्यात लासलगाव, विंचूर, अंदरसूल, पिंपळगाव बसवंत, मुंगसे, ताहाराबाद, नामपूर, मालेगाव, मनमाड, देवळा, तिसगाव, वैजापूर, आगर, पारनेर, व अहमदनगर येथे नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येत आहे. ही केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी तसेच नाफेडचे व्यवस्थापक निखिल पाडाडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यानुसार उद्यापासून येवल्यात नाफेडच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कांदा उप्तादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

Back to top button