शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा केंद्राचा प्रयत्न निषेधार्ह : बाळासाहेब थोरात | पुढारी

शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा केंद्राचा प्रयत्न निषेधार्ह : बाळासाहेब थोरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्कवाढीचे केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. टोमॅटोचे दर वाढल्यानंतर नेपाळहून टोमॅटोची आयात केली गेली. आता कांद्याचे चांगले दर शेतकऱ्यांना मिळत असताना कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ केली. शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा केंद्राचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेच्या तयारीनिमित्त बुधवारी (दि.२३) नाशिक दौऱ्यावर आलेल्या थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कांदा प्रश्नावरून त्यांनी केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीकास्त्र डागले. केंद्राने लावलेले शुल्क अन्यायी आहे. शेतकऱ्याला आता कुठे चार पैसे अधिक मिळत होते. त्यामुळे शुल्क वाढवून शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न केला गेला. केंद्राचे हे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक आहे. केंद्र सरकारला ग्राहकांचे हित जपायचे असल्यास, अनुदानातून ग्राहकाला दिलासा देण्याची गरज होती. परंतु, त्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांवरच अन्याय करत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. केंद्राने जाहीर केलेला २४१० रुपयांचा भाव कमी आहे. यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

गटबाजी केवळ मनाचे खेळ!

नाशकात काँग्रेसमध्ये कुठेही गटबाजी नसून हा मनाचा खेळ आहे. आमच्या पक्षात लोकशाही अधिक असल्यामुळे गटबाजी दिसते. परंतु,आम्ही एकत्र राहू आणि विरोधकांच्या विरोधात लढू, असा दावाही थोरात यांनी केला आहे.

नेहरू-गांधीचे यश

चांद्रयान -३ चे चंद्रावरील लॅन्डींग ही देशासाठी आनंदाची बाब आहे. परंतु, या यशामागे तत्कालिन पंतप्रधान पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधीचे यश आहे. इस्त्रोची स्थापना काँग्रेसच्या काळातच झाली. इंदिरा गांधीनी अंतराळवीर आकाश शर्मा सोबतच्या संवादाचे व्हिडीओ आजही फिरत आहेत. त्यामुळे या मोहीमेत नेहरू, गांधीचा मोठा वाटा असल्याचा दावाही थोरात यांनी केला आहे. 

हेही वाचा :

Back to top button