लालपरीला पांडुरंग पावला, नाशिक विभागाला आषाढी वारीतून दीड कोटीचे उत्पन्न | पुढारी

लालपरीला पांडुरंग पावला, नाशिक विभागाला आषाढी वारीतून दीड कोटीचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अनेक जण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच खासगी वाहनांद्वारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते एसटीने वारी करतात. यंदाही भाविकांनी लालपरीला पसंती दिल्याने आषाढी यात्रेच्या प्रवासी वाहतुकीतून नाशिक विभागाला तब्बल दीड कोटीचे उत्पन्न मिळाले.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने यंदाही वारकऱ्यांसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होेते. नाशिक विभागातून पंढरपूर यात्रेसाठी दि. २५ जून ते ४ जुलै या कालावधीत २९० बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बसगाड्यांनी सुमारे ९८६ फेऱ्या पूर्ण करत ३० लाखांहून अधिक किलोमीटर अंतर कापले. संपूर्ण यात्रेत 3८ हजार ८८७ प्रौढ, १३ हजार ३४० ज्येष्ठ नागरिक, तर १ हजार ७६९ लहान प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तसेच २६ हजार ४५८ महिलांनी, तर ८ हजार ८३८ ज्येष्ठ नागरिकांनी लालपरीतून पंढरपूर गाठले. त्यातून एसटीला १ कोटी ४९ लाख २२ हजार ३५९ उत्पन्न मिळाले.

दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावानंतर भाविकांनी एसटीतून लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेतले होते. त्यातून ९४ लाख ८५ हजार ८७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एसटी महामंडळाला ५५ लाखांहून अधिक फायदा झाला.

प्रवासी संख्या

प्रौढ – ३८,८८७

महिला – २६,४५८

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक – १३,३४०

ज्येष्ठ नागरिक – ८,८३८

लहान मुले – १,७६९

हेही वाचा : 

Back to top button