Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी | पुढारी

Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी

सुरगाणा : आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कुर्बानी देण्याचा स्वागतार्ह निर्णय सुरगाणा येथील मुस्लिम बांधवांनी घेतला असून या निर्णयाचे स्वागत हिंदू बांधवांनी केले आहे.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी (गुरुवारी) आली आहे. हिंदू बांधव आषाढी एकादशीला उपवास करतात आणि मुस्लिम बांधव आपापल्या रितीरिवाजा प्रमाणे बकऱ्याची कुर्बानी देऊन बकरी ईद हा सण साजरा करतात. मात्र यावेळी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरगाणा शहरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी करतील मात्र कुर्बानी दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत हिंदू बांधवांनी केले आहे.

येथील मशिद मध्ये गुरुवारी सकाळी नऊ वाजता नमाज अदा केली जाणार आहे. हिंदू व मुस्लिम बांधव तसेच सर्व समाज एकत्र व सलोख्याने रहावेत यासाठीच दोन्ही सण एकत्र आले हि परमेश्वराची कृपा असल्याची भावना मौलाना अबू बकर यांनी यावेळी व्यक्त केली. रतन चौधरी यांनी देखील सुरगाणा येथे गेली अनेक वर्षे येथे भाईचारा असून एकमेकांविषयी आदर असल्याचे सांगितले. तर शहरात असाच सलोखा ठेऊन ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांनी केले.

याप्रसंगी पोलिस निरीक्षक संदिप कोळी, जेष्ठ नागरिक भिकाशेठ पठाण, माजी नगरसेवक अकिल पठाण, मौलाना अबू बकर, मेहमूद शहा, रफिक मणियार, वजीर मणियार, सलिम शेख, सलमान शहा, इलियास शेख, अब्दुल शेख, इब्राहिम बेलिफ, शफिक शेख, मोसिन मणियार, शफिक अन्सारी, अरबाज मणियार, समद शेख, अनिस शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button